गडचिरोलीत रुजू झालेल्या शिक्षण अधीक्षकांना तिसऱ्या दिवशीच अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 13:11 IST2025-07-04T13:10:13+5:302025-07-04T13:11:06+5:30

Gadchiroli : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात कारवाई

Superintendent of Education who joined Gadchiroli arrested on the third day | गडचिरोलीत रुजू झालेल्या शिक्षण अधीक्षकांना तिसऱ्या दिवशीच अटक

Superintendent of Education who joined Gadchiroli arrested on the third day

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
नागपूर येथील बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात येथील प्राथमिक विभागाच्या अधीक्षकांना ३ जुलै रोजी नागपूर शहर पोलिसांनी अटक केली, त्यामुळे खळबळ उडाली आहे. रवींद्र पंजाबराव सलामे (४५, रा. प्लॉट क्र. ७५, नेहरूनगर, भोजापूर, भंडारा) असे त्या अधीक्षकांचे नाव आहे. १ जुलै रोजी पोलिसांचा ससेमिरा चुकवत ते शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विभागात रुजू झाले. त्यानंतर तिसऱ्याच दिवशी त्यांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली.


रवींद्र सलामे हे यापूर्वी भंडारा येथे प्रभारी शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते. काही दिवस त्यांनी गोंदियातही सेवा बजावली. भंडारा येथे कार्यरत असताना त्यांच्या कालावधीतील शालार्थ आयडी संशयास्पद होते. पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यात तथ्य आढळले. त्यामुळे ते पोलिसांचा ससेमिरा चुकवित फिरत होते. याचदरम्यान त्यांची गडचिरोली येथे प्राथमिक विभागात अधीक्षक म्हणून बदली झाली. ते १ जुलै रोजी हजर झाले व लगेचच किरकोळ रजेवर गेले, त्यानंतर शालार्थ आयडी प्रकरणात पोलिसांनी अटक केल्याचा अहवालही त्यांनी जि. प.च्या प्राथमिक शिक्षण विभागाला धाडला, अशी माहिती सूत्रांनी दिली.


६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी
अधीक्षक रवींद्र सलामे यांना अटकेनंतर नागपूर येथे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.


सलामेंवर आरोप काय ?
पराग नानाजी पुडके (रा. लाखनी, भंडारा) हा कोणत्याही शाळेमध्ये सहायक शिक्षक पदावर नियुक्त नसताना त्याची नानाजी पुडके विद्यालय जेवनाळा (जि. भंडारा) या शाळेतील मुख्याध्यापक पदाच्या नियुक्तीसाठी शिक्षणाधिकारी (मा.) यांचे बनावट नियुक्ती मान्यता आदेश बनवले. सेवा सातत्य, एसकेबी शाळा, यादवनगर, नागपूर या शाळेच्या लेटरहेडवर अटक आरोपी महेंद्र म्हैसकर याच्यासोबत कट कारस्थान रचून बनावट अनुभव प्रमाणपत्र तयार केले, असा अधीक्षक रवींद्र सलामे यांच्यावर आरोप असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Web Title: Superintendent of Education who joined Gadchiroli arrested on the third day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.