लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उन्हाळा सुरू होताच घरांमध्ये आणि दुकानदारांकडून कूलरचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू होतो. मात्र कूलर वापरताना आवश्यक ती सुरक्षा न बाळगल्यास विजेच्या धोक्यामुळे गंभीर अपघात होऊ शकतात. अनेकदा शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे कूलर सुरक्षितरित्या वापरण्याचे आणि विजेच्या धक्क्यापासून धोक्यापासन बचाव करण्याचे महावितरणने आवाहन केले आहे.
कूलर सुरू असताना किंवा त्यात पाणी भरताना ओल्या हातांनी स्पर्श केल्यास विजेचा धक्का बसू शकतो. अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. कूलरमध्ये पाणी भरताना विजेचा पुरवठा पूर्णपणे बंद ठेवावा. थ्री-पिन प्लग चा वापर करावा आणि अर्थिग व्यवस्थित तपासा विजेच्या गळतीमुळे धोका वाढतो. त्यामुळे अर्थिग लिकेज सर्किट ब्रेकर बसवावे. पाणी भरण्यासाठी प्लास्टिकच्या पाइपचा वापर करावा. कूलरच्या बॉडीला स्पर्श करू नये. कूलरच्या वायर आणि स्विच वेळोवेळी तपासा आणि जीर्ण झाल्यास त्वरित बदलवावा, असे आवाहन महावितरणने नागरिकांना केले आहे. काही वर्षापूर्वी नजीकच्या गोगाव येथे कुलरमध्ये पाणी भरताना विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू झाला होता.
या बाबी ठेवा ध्यानात...
- लहान मुलांना कूलरच्या वायर, स्विच किंवा पाण्यात हात घालण्याची सवय असते त्यामुळे त्यांना विजेच्या धोक्यापासून दूर ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
- कूलरच्या आजूबाजूला मुलांना खेळू देऊ नये. स्विच आणि वायर व्यवस्थित झाकलेले असावेत. कूलरची योग्य देखभाल करून शॉक येण्याची शक्यता कमी करावी.
- घरात कूलरसाठी स्वतंत्र अर्थिग असावी याची खात्री करावी, असे आवाहन महावितरणने गडचिरोली जिल्ह्यातील वीज ग्राहकांना केले आहे.
घरातील वीज उपकरणांची तपासणी करणे गरजेचेगेल्या काही वर्षात कूलरच्या शॉकमुळे अनेक अपघात झाले आहेत. थोडीशी खबरदारी घेतल्यास जीवितहानी आणि आर्थिक नुकसान टाळता येईल. विजेच्या उपकरणांची वेळोवेळी तपासणी करून योग्य ती सुरक्षा पाळल्यास कूलरचा उपयोग सुरक्षितरित्या करता येईल.