Students will get English and mathematics education through action | विद्यार्थ्यांना कृतीतून मिळणार इंग्रजी व गणिताचे शिक्षण
विद्यार्थ्यांना कृतीतून मिळणार इंग्रजी व गणिताचे शिक्षण

ठळक मुद्देशिक्षकांसाठी मार्गदर्शक : डीआयईसीपीडीने तयार केली कृतीपुस्तिका; नावीन्यपूर्ण उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : इंग्रजी व गणित हे कठीण मानले जाणारे विषय विद्यार्थ्यांना कृतीतून शिकविल्यास अध्ययन क्रिया सुलभ होण्यास मदत होईल. या उद्देशाने गडचिरोली डीआयईसीपीडीचे प्राचार्य, अधीव्याख्याता व विषय सहाय्यकांनी कृतीपुस्तिका तयार केली. या कृती पुस्तीकेचे विमोचन गुरूवारी करण्यात आले.
कोणताही विषय विद्यार्थ्यांना कृतीतून व शैक्षणिक साहित्यांचा वापर करून शिकविल्यास त्यांना लवकर समजण्यास मदत होते. ही बाब प्रत्येक शिक्षकाला व शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहित आहे. मात्र अध्यापन करताना प्रत्यक्ष कृती कशी करावी, हे कळत नाही. इंग्रजी हा वेगळी भाषा असलेला विषय आहे. त्यामुळे तो अनेक विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून जातो. गणित हा विषय रटाळ मानला जातो. त्यामुळे या दोन्ही विषयांचे तास सुरू होताच विद्यार्थ्यांना झोप येण्यास सुरूवात होते. ही अडचण लक्षात घेऊन डीआयईसीपीडीतर्फे गणित व इंग्रजी विषयांची कृतीपुस्तिका तयार केली आहे. यामध्ये वेगवेगळे घटक कोणती कृती करून शिक्षकाने शिकवावे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. सदर कृतीपुस्तिका जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील शिक्षकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
कृतीपुस्तिकेचे विमोचन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डीआयईसीपीडीचे प्राचार्य शरचंद्र पाटील, शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ.विनीत मत्ते, संभाजी भोजने, अधिव्याख्यात मिलींद अघोर, वैशाली येगलोपवार, पुनीत मातकर उपस्थित होते. संचालन कुणाल कोवे यांनी केले.

सीईओंनी केली प्रशंसा
विमोचनानंतर सीईओ डॉ.राठोड यांनी कृतीपुस्तिकेची पाहणी केली. या कृतीपुस्तिकेत गणित व इंग्रजी विषयासाठी अनेक कृती दिल्या असल्याचे लक्षात आले. मार्गदर्शन करताना डॉ.राठोड म्हणाले, २१ व्या शतकातील विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने लक्षात घेता केवळ पाठ्यपुस्तकातून अध्ययन निष्पत्ती साध्य होईलच असे नाही. त्यासाठी प्रत्यक्ष कृती, अनुभव अत्यंत महत्त्वाचा आहे. कृती व अनुभव देण्याचे काम कृतीपुस्तिका करणार आहे. गडचिरोली डीआयईसीपीडीने तयार केलेली कृतीपुस्तिका जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यभरातील शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे गौरवोद्गार काढले.

Web Title: Students will get English and mathematics education through action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.