पोलीस मुख्यालयात कार्यक्रम : पोलीस अधीक्षकांचे आवाहनगडचिरोली : महाराष्ट्र दर्शनाहून आलेल्या विद्यार्थ्यांनी जीवनात मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी पुस्तकांशी मैत्री करावी व स्वत:च्या कुटुंबासह परिसराचा विकास करण्याचे ध्येय उराशी बाळगावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले.आपला महाराष्ट्र योजनेंतर्गत महाराष्ट्र दर्शन सहलीच्या सहाव्या टप्प्याच्या पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या समारोपीय कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे उपस्थित होते. महाराष्ट्र दर्शन सहलीत नक्षलवाद्यांचे नातेवाईक व नक्षल पीडित कुटुंबातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. सहलीत सहभागी झालेले विद्यार्थी दुर्गम नक्षलग्रस्त भागातील होते. दरम्यान नक्षलवाद्यांच्या नातेवाईक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सहलीच्या संदर्भातील अनुभव उपस्थितांसमोर मांडले. सुमित्रा गोटा, नितीन हिचामी, प्रणाली कुमरे, दिलीप आतला आदी विद्यार्थ्यांनी सहलीदरम्यान पाहिलेल्या ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळांविषयी आपले अनुभव व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी रेला नृत्य व आदिवासी संस्कृतितील गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन जिल्ह्याच्या विकासात आपले योगदान द्यावे, जिल्ह्यात उद्योगधंद्याचा अभाव असल्याने अनेक आदिवासी युवक नक्षल चळवळीकडे वळत आहेत. त्यामुळे युवकांमध्ये नक्षल चळवळीविरोधी जनजागृती करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. संचालन प्रविण निंबाळकर तर आभार बोराडे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
उच्च ध्येय बाळगून विद्यार्थ्यांनी स्वत:चा विकास साधावा
By admin | Updated: August 21, 2014 23:53 IST