वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आंदोलन
By Admin | Updated: January 17, 2015 22:59 IST2015-01-17T22:59:30+5:302015-01-17T22:59:30+5:30
भोजन कंत्राटदाराने आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जेवण देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मात्र अधिकारी उपस्थित

वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आंदोलन
गडचिरोली : भोजन कंत्राटदाराने आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जेवण देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मात्र अधिकारी उपस्थित नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली व धरणे आंदोलन केले. त्यानंतर वसतिगृहातील समस्यांबाबत पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याशी चर्चा केली.
आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी जेवण मिळत नसल्याच्या कारणावरून प्रकल्प कार्यालयावर धडक दिली. काही दिवसांपूर्वी विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयापुढे आंदोलन केले होते. याची दखल घेत प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी वसतिगृहाची पाहणी केली असता, विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रकल्प अधिकाऱ्यांना कोंडून ठेवले. त्यानंतर काही पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर पी. शिवशंकर यांची सुटका करण्यात आली.
यासंदर्भात सहायक प्रकल्प अधिकारी दशरथ कुळमेथे यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गैरकायद्याची मंडळी जमवून धक्काबुक्की करणे, शिविगाळ करणे, गाडीत कोंबून ठेवणे तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून आविसंचे प्रा. दौलत धुर्वे व आठ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. तसेच जोपर्यंत जेवण मिळणार नाही, तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका घेतली. दशरथ कुळमेथे यांनी जेवणाची पर्यायी व्यवस्था केल्याचे सांगितले. मात्र पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय हटणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर प्रा. दौलत धुर्वे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याशी चर्चेला पाचारण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करण्यात यावी, विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणे यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल, असे आश्वासन आत्राम यांनी दिले.