विद्यार्थ्यांचे वर्ग व शाळेचे व्यवस्थापन एकाच खाेलीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 05:00 IST2021-02-22T05:00:00+5:302021-02-22T05:00:37+5:30
प्राथमिक शिक्षण हा बालकांच्या विकासाचा पाया आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास हाेणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षकांनी वर्गांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना अधिकाधिक वेळ अध्यापन करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने शाळांमध्ये वर्गखाेली, मुख्याध्यापक कक्ष, स्टाफरूम, वाचनालय, प्रसाधनगृह, क्रीडांगण व इतर सुविधा असणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांचे वर्ग व शाळेचे व्यवस्थापन एकाच खाेलीत
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास एक हजार ५५० प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहेत. या शाळांपैकी जवळपास ३५० शाळांमध्ये मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कक्ष नाही. त्यामुळे मुख्याध्यापक आपले प्रशासकीय काम विद्यार्थ्यांच्या वर्गखाेलीतच बसून करतात. जि. प.च्या केवळ ३२ शाळांमध्येच स्टाफरूम आहे, इतर शाळांमध्ये स्टाफरूम नाही. त्यामुळे अध्ययन व अध्यापनाचे कार्य प्रभावित हाेते.
प्राथमिक शिक्षण हा बालकांच्या विकासाचा पाया आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास हाेणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षकांनी वर्गांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना अधिकाधिक वेळ अध्यापन करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने शाळांमध्ये वर्गखाेली, मुख्याध्यापक कक्ष, स्टाफरूम, वाचनालय, प्रसाधनगृह, क्रीडांगण व इतर सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र, अहेरी उपविभाग व काेरची, कुरखेडा, धानाेरा तालुक्यांतील बऱ्याच जि. प. शाळांमध्ये अनेक भाैतिक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे अध्ययन व अध्यापन कार्यात व्यत्यय येत असून, शिक्षक व विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. जिल्हा परिषदेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
शिक्षकांची हाेते दमछाक
काेराेना महामारीची समस्या आटाेक्यात आल्यानंतर पहिल्या टप्प्यात इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवीचे वर्ग प्रत्यक्ष भरविले जात आहेत. सध्या इयत्ता पहिली ते चाैथीचे वर्ग प्रत्यक्ष बंदच आहेत. येथे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. दुर्गम व अतिदुर्गम भागातील जि. प. शाळांमध्ये पुरेशा वर्गखाेल्या नाहीत, मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कक्ष नाही. स्टाफरूमचा पत्ता नाही. त्यामुळे शाळेचे विविध साहित्य, दस्तावेज, फर्निचर एका वर्गखाेलीतच काेपऱ्याला ठेवावे लागते. या खाेलीत अध्यापनाचे काम केले जाते. पुरेशा भाैतिक सुविधांअभावी दुर्गम भागातील शाळांचे शिक्षक व मुख्याध्यापक त्रस्त झाले आहेत.
या शाळांमध्ये स्टाफरूमची व्यवस्था
गडचिराेली जिल्ह्यात जिल्हा परिषदेंतर्गत १० माध्यमिक शाळा आहेत. याशिवाय पाच ठिकाणी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये आहेत. तसेच इतर माेठ्या शाळा मिळून एकूण ३२ ठिकाणी स्टाफरूमची व्यवस्था आहे. इतर शाळांमध्ये स्टाफरूमचा पत्ता नाही.