अजब प्रथा; पाऊस पडावा म्हणून लावले बाहुला- बाहुलीचे लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 03:43 PM2023-07-05T15:43:54+5:302023-07-05T15:45:39+5:30

डीजेच्या दणदणाटात वरातही जोरात, तरुणाईने धरला ठेका

strange customs in armori; dolls wedding for rain | अजब प्रथा; पाऊस पडावा म्हणून लावले बाहुला- बाहुलीचे लग्न

अजब प्रथा; पाऊस पडावा म्हणून लावले बाहुला- बाहुलीचे लग्न

googlenewsNext

महेंद्र रामटेके

आरमोरी (गडचिरोली) : हिरव्यागार फांद्यांनी सजलेला मांडव, त्याला पानांचे तोरण, हळद, वऱ्हाडी, नवरदेव, नवरी, वरात अन् मिष्ठान्न भोजनाचाही बेत. एखाद्या मराठमोळ्या लग्नसोहळ्यासारखे हे चित्र आहे आरमोरीत ४ जुलै रोजी धूमधडाक्यात पार पडलेल्या बाहुला- बाहुलीच्या विवाह समारंभाचे. फक्त लग्नातील वधू - वर हे कोणी तरुण- तरुणी नव्हते तर ते होते खेळण्यातले बाहुले. हो, पावसासाठी बाहुल- बाहुलीचे लग्न लावण्याची ही परंपरा २१ व्या शतकातही आरमोरीकरांनी जपली आहे.

पाऊस पडावा यासाठी २०१५ पासून बाहुला- बाहुलीचे लग्न लावण्याची प्रथा शहरात सुरू झाली. यंदा जूनच्या शेवटी पाऊस झाला, पण दोन दिवस बरसलेल्या पावसाने नंतर विश्रांती घेतली. त्यामुळे शेतातील धानपीक धोक्यात आले, काही ठिकाणी पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला. जुलै उजाडला तरीही समाधानकारक पाऊस न झाल्याने आरमोरीकरांनी बाहुला-बाहुलीचा विवाह लावला.

४ जुलै रोजी लाकडाचे बाहुला बाहुली बनविण्यात आले. त्याला नवे कपडे व बाशिंग बांधून सजविण्यात आले. चौरंग पाट ही बनविण्यात आला. या बाहुला-बाहुलीचा लग्नासाठी मनोज बोरकर यांच्या घराच्या अंगणात हिरव्यागार झाडाच्या फांद्याचे मांडव उभारण्यात आले. मांडवात तोरणं बांधण्यात आले. लग्नाच्या आदल्या आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम घेण्यात येऊन नवरा- नवरी असलेल्या बाहुला-बाहुलीला हळद लावण्यात आली. यावेळी महिला व पुरुषांनी एकमेकांना हळद लावली.

वर्गणी गोळा करून केला खर्च

या विवाहाकरिता वॉर्डातील नागरिकांनी वर्गणी गोळा केली आणि या वर्गणीतून हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पाडला. बाहुलीचे वधूपिता म्हणून मनोज बोरकर तर बाहुल्याचे वरपिता म्हणून म्हणून योगेश कन्नाके यांनी जबाबदारी पार पडली.

लग्नात मंगलाष्टके, मिष्ठान्न भोजनाचा बेत

सायंकाळी ५ वाजता बाहुल्याची वरात योगेश कन्नाके यांच्या घरून काढण्यात आली. डीजेच्या तालावर वाजत गाजत नाचत व धमाल करत वरात ही बाहुलीच्या मंडपी नेण्यात आली.तिथे वरात पोहोचल्यानंतर बाहुलीला महिलांनी लग्नस्थळी आणल्यानंतर सायंकाळी ७:३० वाजता बाहुला-बाहुलीचे हिंदू विवाह पद्धतीने मंगलाष्टके म्हणून लग्न लावून देण्यात आले. लग्नानंतर बाहुला-बाहुलीला भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी जेवणाचा बेतही आखला होता.

Web Title: strange customs in armori; dolls wedding for rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.