अहेरीच्या बसवर एटापल्लीत दगडफेक, दाेघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 16:43 IST2021-12-24T16:37:49+5:302021-12-24T16:43:15+5:30
कर्मचाऱ्यांचे आंदाेलन सुरू झाल्यानंतर अहेरी आगाराची बस पहिल्यांदाच गुरुवारी धावली. ही बस एटापल्लीसाठी साेडण्यात आली हाेती. परत येत असताना एटापल्लीपासून जवळपास दाेन किमी अंतरावर अज्ञात हल्लेखाेरांनी दगडफेक केली.

अहेरीच्या बसवर एटापल्लीत दगडफेक, दाेघे ताब्यात
गडचिराेली : अहेरी आगारातून गुरुवारी साेडण्यात आलेल्या बसवर एटापल्लीजवळ दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी एटापल्ली पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्मचाऱ्यांचे आंदाेलन सुरू झाल्यानंतर अहेरी आगाराची बस पहिल्यांदाच गुरुवारी धावली. ही बस एटापल्लीसाठी साेडण्यात आली हाेती. परत येत असताना एटापल्लीपासून जवळपास दाेन किमी अंतरावर अज्ञात हल्लेखाेरांनी दगडफेक केली. त्यामुळे एसटीच्या काचा तुटल्या. याबाबत अहेरीच्या आगारप्रमुखांनी एटापल्ली पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून अज्ञात आराेपींविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, एटापल्ली पाेलिसांनी दाेघांना ताब्यात घेतले आहे.
आजपर्यंत गडचिराेली जिल्ह्यात अनेक आंदाेलने झाली. मात्र येथील नागरिकांनी एसटीला कधीच लक्ष्य केले नाही. त्यामुळे दगडफेक करणारे नेमके काेण असावेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पाेलिसांनी त्यांचा शाेध घेण्याची गरज आहे.
गडचिराेलीतील कर्मचारी दुसऱ्या दिवशी गायब
आंदाेलकांपैकी काही कर्मचारी कामावर रूजू झाल्याने गडचिराेली आगारातून गुरुवारी तीन बसेस साेडण्यात आल्या हाेत्या. मात्र शुक्रवारी हे कर्मचारी कामावर परत आलेच नाहीत. त्यामुळे पुन्हा एसटीची चाके बंद पडली आहेत.