एसटी करणार आता माल वाहतूक; स्क्रॅप झालेल्या वाहनांचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 20:00 IST2020-05-25T20:00:11+5:302020-05-25T20:00:38+5:30
लॉकडाऊनच्या कालावधीत एसटीची प्रवाशी वाहतूक सेवा मागील दोन महिन्यांपासून बंद आहे. एसटी कर्मचाऱ्यांना थोडेफार काम उपलब्ध होऊन तोट्याचा बोजा कमी व्हावा, यासाठी एसटी महामंडळाने आता माल वाहतुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

एसटी करणार आता माल वाहतूक; स्क्रॅप झालेल्या वाहनांचा वापर
दिगांबर जवादे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लॉकडाऊनच्या कालावधीत एसटीची प्रवाशी वाहतूक सेवा मागील दोन महिन्यांपासून बंद आहे. एसटी कर्मचाऱ्यांना थोडेफार काम उपलब्ध होऊन तोट्याचा बोजा कमी व्हावा, यासाठी एसटी महामंडळाने आता माल वाहतुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी स्क्रॅप झालेल्या एसटी बसगाड्या वापरल्या जाणार आहेत.
प्रवाशी वाहतुकीसाठी जास्तीत जास्त १० वर्ष किंवा ६ लाख ५० हजार किमी चालेपर्यंत वाहन वापरता येते. त्यानंतर सदर वाहन स्क्रॅप (वापरातून दूर) केले जाते. एसटी महामंडळाकडे आयुर्मान संपलेल्या जवळपास ३ हजार बसगाड्या आहेत. सदर बसगाड्या प्रवाशी वाहतुकीसाठी वापरता येत नसल्या तरी त्या माल वाहतुकीसाठी वापरता येणे शक्य आहे. तसेच महामंडळाकडे एकूण २७८ ट्रक आहेत. या ट्रकचाही वापर माल वाहतुकीसाठी केला जाणार आहे. विशेष म्हणजे खासगी व्यक्तींनाही माल वाहतुकीसाठी एसटीची वाहने भाड्याने उपलब्ध होणार आहेत. या वाहनामध्ये जास्तीत जास्त ८ ते ९ मेट्रीक टन माल वाहतूक होणार आहे.
एसटीच्या प्रत्येक विभागीय कार्यालयात स्क्रॅप झालेल्या बसेस आहेत. त्या बसेसचे मालवाहू वाहनामध्ये रूपांतर करून शक्य तेवढ्या लवकर माल वाहतूक सुरू करावी, असे निर्देश एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयामार्फत देण्यात आले आहेत. गडचिरोली विभागात स्क्रॅप झालेल्या २३ बसगाड्या आहेत. या बसगाड्यांना मालवाहू वाहनांमध्ये रूपांतरीत केल्या जाणार आहेत. वाहतुकीसाठी माल उपलब्ध होईल या दृष्टीने गडचिरोली विभागाने नियोजनसुद्धा सुरू केले आहे.
प्रवाशांना आकर्षित करून उत्पन्न वाढविण्यासाठी एसटीने आजपर्यंत अनेक प्रयोग केले आहेत. यातील काही प्रयोग यशस्वीसुद्धा झाले आहेत. तरीही सद्यस्थितीत एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे. माल वाहतूक करतानाही एसटीला खासगी ट्रक व्यावसायिक यांच्याशी स्पर्धा करावी लागणार आहे. या स्पर्धेत टिकण्याचे कौशल्य कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये निर्माण करावे लागणार आहे.
सीट काढून बसविणार मागे दरवाजा
बसचे मालवाहू वाहनामध्ये रूपांतर करण्यासाठी बसमधील संपूर्ण आसने काढली जाणार आहेत. प्रवाशी प्रवेश करण्यासाठी असलेला समोरचा दरवाजा बंद केला जाणार आहे. मागच्या बाजूने मोठे दार बसविले जाणार आहे. चारही बाजूने टिनाचे पत्रे राहत असल्याने पावसापासून मालाचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे.