पूरग्रस्तांसाठी सरसावले एसटी महामंडळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 06:00 IST2019-10-13T06:00:00+5:302019-10-13T06:00:47+5:30
एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांची टिम १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी भामरागड तालुक्यातील गुडूरवाही गावात पोहोचली. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी एसटीच्या अधिकाऱ्यांमार्फत गावात स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. स्वच्छता मोहिमेनंतर नागरिकांना मदतीचे वितरण केले जाईल.

पूरग्रस्तांसाठी सरसावले एसटी महामंडळ
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एसटी महामंडळाच्या गडचिरोली विभागातील कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्तांसाठी १ लाख २५ हजार रुपयांचा निधी गोळा केली. या निधीतून साहित्य खरेदी करून सदर साहित्य भामरागड तालुक्यातील गुडूरवाही येथील पूरग्रस्तांना पाठविण्यात आले.
भामरागड तालुक्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक कुटुंब बेघर झाले. पूरग्रस्तांना जिल्हाभरातून मदत मिळाली. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनीही पूरग्रस्तांसाठी निधी गोळा केला. ब्रह्मपुरी, गडचिरोली, अहेरी आगारातील कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने १ लाख २५ हजार रुपयांचा निधी जमा केला. या निधीतून पूरग्रस्तांसाठी सोलर लॅम्प, स्ट्रिट लॅम्प, प्लास्टिक ड्रम, हंडा, चादरी, ताडपत्री, साड्या, चप्पल, कपडे, दिवाळी निमित्ताने खाद्य वस्तू खरेदी केल्या. सदर वस्तू भरलेल्या दोन बसेस गडचिरोली आगारातून १२ ऑक्टोबर रोजी भामरागडसाठी रवाना करण्यात आल्या आहे. यावेळी विभाग नियंत्रक अशोककुमार वाडीभस्मे, प्रा. मुखरू उरकुडे, शेमदेव चापले यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी एसटीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्राची लोकवाहिणी म्हणून एसटीची ओळख आहे. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या प्रवासाची धुरा सांभाळणारे एसटी कर्मचारी राज्यावर कधी संकट कोसळल्यास मदतीचाही हात पुढे करतात. गडचिरोली विभागातील कर्मचाºयांनीही आपल्या जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदत गोळा केली. एसटीच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
गुडूरवाही गावात आज स्वच्छता मोहीम
एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांची टिम १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी भामरागड तालुक्यातील गुडूरवाही गावात पोहोचली. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी एसटीच्या अधिकाऱ्यांमार्फत गावात स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. स्वच्छता मोहिमेनंतर नागरिकांना मदतीचे वितरण केले जाईल. त्यानंतर आदिवासी बांधवांसोबत सहभोजन केले जाईल, अशी माहिती एसटीचे गडचिरोली विभाग प्रमुख अशोककुमार वाडीभस्मे यांनी दिली आहे. अशा प्रकारचा लोकोपयोगी उपक्रम एसटी विभागामार्फत जिल्ह्यात पहिल्यांदाच राबविला जात आहे.