गावांत जल बचतीचा संदेश पोहोचवा
By Admin | Updated: March 20, 2016 02:13 IST2016-03-20T02:13:38+5:302016-03-20T02:13:38+5:30
जिल्ह्यात जल जागृती सप्ताह सुरू करण्यात आला आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून धानोरा तालुक्यातील ग्रामस्तरावर जल बचतीचा संदेश पोहोचवावा, ...

गावांत जल बचतीचा संदेश पोहोचवा
जल जागृती सप्ताह : धानोरा पं. स. मध्ये कार्यशाळा
धानोरा : जिल्ह्यात जल जागृती सप्ताह सुरू करण्यात आला आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून धानोरा तालुक्यातील ग्रामस्तरावर जल बचतीचा संदेश पोहोचवावा, नागरिकांमध्ये पाण्याच्या काटकसरीबाबत जनजागृती करावी, असे आवाहन धानोरा येथे पं. स. सभागृहात शनिवारी आयोजित कार्यशाळेत अधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले.
कार्यशाळेचे उद्घाटन उपसभापती माया मोहुर्ले यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती कल्पना वड्डे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून पं. स. सदस्य बिसाऊ मार्गिया, अशोक हलामी, तानूजी पदा, नामदेव शेडमाके, जास्वंदा करंगामी, गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे, सहाय्यक गटविकास अधिकारी जे. टी. कुलसंगे, एस. एस. कोरंटलावार, सी. वाय. शिवणकर, एस. जे. निमसरकार, आर. जी. उचे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना सभापती कल्पना वड्डे यांनी ग्रामीण भागात शुद्ध पाण्याची समस्या निर्माण होते, विशेष करून पावसाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागते. त्यामुळे अनेक आजार होतात. पाण्याचा काटकसरीने वापर केला नाही, तर भविष्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळावा, असे मार्गदर्शन केले. पाणी बचतीसाठी पुढाकार घ्यावा, टंचाईची समस्या उद्भवू नये याकरिता पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन कोल्हे यांनी केले. प्रास्ताविक जुआरे, संचालन मडावी तर आभार जांभुळकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी व्ही. गोवर्धन, रवी जांभुळकर यांनी सहकार्य केले.