रामगड परिसरात फवारणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:37 IST2021-04-08T04:37:00+5:302021-04-08T04:37:00+5:30
कुरखेडा : रामगड- पुराडा भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या भागात तत्काळ डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी ...

रामगड परिसरात फवारणी करा
कुरखेडा : रामगड- पुराडा भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या भागात तत्काळ डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यंदाच्या पावसाळ्यातही फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागले. नियमित फवारणीकरिता वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
शेतकरी विविध योजनांबद्दल अनभिज्ञ
देसाईगंज : कृषी, महसूल व वन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील गावामध्ये पोहोचत नसल्याने या भागातील अनेक शेतकऱ्यांना योजनांची माहिती नाही.
कोडसेपल्लीत समस्या सोडविण्याची मागणी
अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण जात आहे. परिणामी जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे.
ग्रामीण भागात वीज चोरीचे प्रमाण वाढले
मुलचेरा : महावितरणचे बहुतांश कर्मचारी घरूनच कारभार हाकत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याचा फटका महावितरणला बसत आहे. त्यामुळे महावितरणने लक्ष देण्याची मागणी सुज्ञ ग्राहकांकडून होत आहे. मुलचेरा तालुक्याच्या ग्रामीण भागात वीज चोरीचे प्रमाण अधिक आहे.
टिपागडला परिसराला अभयारण्याचा दर्जा द्या
कुरखेडा : तालुक्यातील टिपागड अभयारण्याच्या निर्मितीच्या हालचाली मंदावल्याचे दिसून येत आहे़ या अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन तीव्र गतीने करण्याची गरज आहे़ शिवाय येथील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे़
दुग्ध संस्थांना आर्थिक मदतीची मागणी
गडचिरोली : अपुऱ्या दूध पुरवठ्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ६२ दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी दूध उत्पादन शेतकऱ्यांना आर्थिक मदत व मार्गदर्शनाची गरज आहे. मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात दूध उत्पादनाला बराच वाव असल्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
स्नेहनगरात जंतुनाशक फवारणी करा
गडचिरोली : स्थानिक स्नेहनगरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथे फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या वार्डात फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे येथे डासांची उत्पत्ती वाढली आहे. कोरोना व इतर रोगांचा संसर्ग होऊ नये, यासाठी पालिका व आरोग्य प्रशासनाने नाल्यांमध्ये जंतुनाशक फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.
कमी रेंजमुळे भ्रमणध्वनीधारक त्रस्त
आष्टी : जयरामपूर परिसरातील भ्रमणध्वनी सेवा मागील अनेक दिवसांपासून विस्कळीत होत असल्याने या भागातील विविध कंपनीच्या भ्रमणध्वनी ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे भ्रमणध्वनी मनोऱ्यांची रेंज वाढवावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
गोगाव नजीकचे नागोबा देवस्थान दुर्लक्षितच
गडचिरोली : येथून पाच किमी अंतरावर असलेल्या गोगावपासून दोन किमी अंतरावरील नागोबा देवस्थान व परिसराच्या विकासाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नागोबा देवस्थानात दरवर्षी रथसप्तमीनिमित्त मोठी जत्रा भरते. हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र येथे निवास, पाणी व इतर सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे भाविकांची पंचाईत होते.
रुग्णवाहिकांची संख्या वाढवा
गडचिरोली : गाव पातळीवरील रूग्णांना अतिमहत्त्वाच्या उपचारासाठी खासगी वाहनाने रूग्णालयात शहरात जावे लागते. अनेकदा वाहनेही वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांना अनेकदा आपल्या प्राणाला मुकावे लागते.
बँकांअभावी ग्रामीण नागरिकांची अडचण
धानोरा : ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा नाहीत. धानोरा तालुक्यातील नागरिकांना व्यवहार करण्याकरिता तालुका मुख्यालयात यावे लागते. तालुक्यात मुंगनेर, पेंढरी येथे बँकेची गरज आहे. राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने मुंगनेर, पेंढरी भागातील नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.
पिशव्यांमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात
गडचिरोली : शहरात अनेक मोकाट जनावरे फिरत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरात टाकलेला केरकचरा, प्लास्टिक जनावरे खात असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
झाडांच्या फांद्यांनी झाकळले पथदिवे
आष्टी : परिसरात बहुतांश गावांमधील पथदिव्यांसमोर झाडाच्या फांद्या आल्या आहेत. त्यामुळे पथदिव्यांचा प्रकाश रस्त्यावर पोहोचत नाही. काही पथदिवे वेलींनी झाकळले आहेत. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पथदिव्यांसमोरील फांद्या तोडाव्या, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
शेतकरी विविध योजनांबद्दल अनभिज्ञ
भामरागड : कृषी, महसूल व वन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील गावांमध्ये पोहोचत नसल्याने या भागातील अनेक शेतकऱ्यांना योजनांची माहिती नाही.
कन्नमवार नगरात डासांचा प्रादुर्भाव
गडचिरोली : कन्नमवार नगरातील अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. नागरिकांना विविध आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे नियमित डास प्रतिबंधक फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अंकिसा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
अंकिसा : येथील मुख्य मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गावरून आसरअल्ली दरम्यानच्या गावातील नागरिक ये-जा करीत असल्याने या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे मार्गाची दुरूस्ती करावी, अशी मागणी आहे.
अनेक अंगणवाडी केंद्र भाड्याच्या खोलीत
गडचिरोली : जिल्हाभरातील ५० वर अंगणवाड्यांना स्वत:ची इमारतच नाही. त्यामुळे या अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत भरविल्या जात आहेत. शहरात लहान व कौलारू खोलीत अंगणवाडी केंद्र आहेत. गेल्या अनेक वर्षापासून मागणी करूनही प्रशासनाने स्वतंत्र इमारती बांधल्या नाही. परिणामी पूर्व प्राथमिक शिक्षणावर परिणाम हाेत आहे.