नियोजनाचा निधी वेळेत खर्च करा - अम्ब्रीशराव
By Admin | Updated: January 17, 2015 01:37 IST2015-01-17T01:37:17+5:302015-01-17T01:37:17+5:30
गडचिरोली जिल्ह्याची मागास जिल्हा प्रतिमा बदलविण्यासाठी वीज, पाणी, रस्ते, शिक्षण, वन व आरोग्य या क्षेत्रात पुढील पाच वर्षांत करावयाच्या विकास कामाचे व्हिजन डॉक्युमेंट तातडीने तयार करण्याचे निर्देश ..

नियोजनाचा निधी वेळेत खर्च करा - अम्ब्रीशराव
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याची मागास जिल्हा प्रतिमा बदलविण्यासाठी वीज, पाणी, रस्ते, शिक्षण, वन व आरोग्य या क्षेत्रात पुढील पाच वर्षांत करावयाच्या विकास कामाचे व्हिजन डॉक्युमेंट तातडीने तयार करण्याचे निर्देश पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी प्रशासनाला शुक्रवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे, खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी रणजितकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, मुख्य वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी, लघुगटाचे सदस्य किसन नागदेवे आदी उपस्थित होते.
या बैठकीत खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे यांनी विकासाच्या विविध संकल्पना व समस्या मांडल्या. यावेळी जिल्हा विकासाबाबत विविध विभागाने सादरीकरण केले. बैठकीचे संचालन व आभार जिल्हा नियोजन अधिकारी स. रा. भांगरे यांनी केले.
असा आला जिल्हा विकासासाठी निधी
सर्वसाधारण योजनेत सन २०१४-१५ साठी ११७ कोटी मंजूर नियतव्यय होता. त्यापैकी ७० कोटी ३० लाख ७८ हजार प्राप्त झाले. प्राप्त तरतुदीपैकी ५१ कोटी ५० लाख ६३ हजार अंमलबजावणी यंत्रणेला वितरीत करण्यात आले आहे. त्यापैकी ३१ डिसेंबर २०१४ अखेर २६ कोटी ५६ लाख ३३ हजार एवढा निधी खर्च झाला. खर्चाची टक्केवारी ५१.५७ टक्के एवढी आहे. आदिवासी उपयोजना २०१४-१५ साठी २१५ कोटी ३० लाख मंजूर नियतव्यय असून १२८ कोटी २३ लाख निधी प्राप्त झाला. त्यापैकी ११३ कोटी ७७ लाख वितरीत करण्यात आला. वितरीत निधीपैकी ३१ डिसेंबर अखेर ८१ कोटी खर्च करण्यात आला. खर्चाची टक्के वारी ७१.२१ एवढी आहे.