शिक्षणावर पैसा खर्च करा
By Admin | Updated: October 27, 2016 01:45 IST2016-10-27T01:45:24+5:302016-10-27T01:45:24+5:30
समाजामध्ये दारू, तंबाखू, खर्रा, बिडी यासारख्या व्यसनाधिनतेचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.

शिक्षणावर पैसा खर्च करा
सत्यपाल महाराजांचे आवाहन : कीर्तनातून व्यसनमुक्तीचा मंत्र
आरमोरी : समाजामध्ये दारू, तंबाखू, खर्रा, बिडी यासारख्या व्यसनाधिनतेचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. व्यसनाच्या आहारी गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे. व्यसनाधिनताही समाजाला लागलेली किड असून व्यसनाने कुटुंबाची अधोगती होते. त्यामुळे दारू, तंबाखू व इतर व्यवसनांवर पैसा खर्च करण्यापेक्षा आपल्या मुला-मुलींच्या शिक्षणावर पैसा खर्च करा, असे आवाहन कीर्तनकार सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज चिंचोळकर यांनी केले.
मुक्तीपथ अभियानांतर्गत शोधग्राम सर्च, टाटा ट्रस्ट व जिल्हा प्रशासनाच्या वतीने मंगळवारी रात्री आरमोरी येथील हितकारिणी महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित जाहीर कीर्तनात ते प्रबोधन करीत होते.
सत्यपाल महाराजांनी कीर्तनातून सामाजिक प्रबोधन करीत विविध दाखले देत समाजात वाढलेली व्यसनाधिनता, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, आंतरजातीय विवाह, महिला सक्षमीकरण, ग्राम स्वच्छता, हागणदारीमुक्त गाव आदी ज्वलंत प्रश्नांवर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाला ८ ते १० हजार नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमास प्रामुख्याने सर्चच्या डॉ. आरती बंग, माजी आ. हरिराम वरखडे, हरीश मने, भाग्यवान खोब्रागडे, लक्ष्मी मने, तहसीलदार मनोहर वलथरे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, काशिनाथ शेबे, अशोक वाकडे, भारत बावनथडे, राजू अंबानी, नंदू पेटेवार उपस्थित होते.