अनेक वाॅर्डांत सट्टापट्टी जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:22 IST2021-07-23T04:22:28+5:302021-07-23T04:22:28+5:30

देसाईगंज : शहरात सट्टापट्टी जोमात सुरू आहे. अनेक युवक सट्टापट्टीच्या नादात लागले आहेत. शहरात शेकडो एजंट सट्टापट्टीची वसुली करीत ...

Speculation is rampant in many wards | अनेक वाॅर्डांत सट्टापट्टी जोमात

अनेक वाॅर्डांत सट्टापट्टी जोमात

देसाईगंज : शहरात सट्टापट्टी जोमात सुरू आहे. अनेक युवक सट्टापट्टीच्या नादात लागले आहेत. शहरात शेकडो एजंट सट्टापट्टीची वसुली करीत आहेत.

ग्रामपंचायतमधील संगणक नादुरुस्त अवस्थेत

सिरोंचा : ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जनतेची कामे तत्काळ व्हावीत, यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून ग्रामपंचायतींना संगणक संच पुरविले. मात्र, अनेक संगणक नादुरुस्त स्थितीत आहेत.

जुन्या इमारतींकडे दुर्लक्ष

गडचिराेली : शहरातील अनेक शासकीय कार्यालयाच्या इमारतींची पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. ही कार्यालये जीर्ण झाल्याने बऱ्याच ठिकाणी गळती लागली आहे; परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, शासकीय अधिकाऱ्यांसह नागरिकांना त्रास हाेत आहे.

बसचा थांबा द्या

गडचिरोली : येथून जवळच असलेल्या येवली येथे जलद बसथांबा आहे. मात्र, गडचिरोली आगाराच्या बसगाड्या व्यतिरिक्त इतर आगारांच्या जलद बसगाड्या येथे थांबत नाहीत. त्यामुळे नागरिकांना त्रास हाेत आहे. मागणी करूनही दुर्लक्ष आहे.

खड्डे बुजवा

गडचिरोली : जिल्ह्यातील बहुतांश मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्डे बुजविण्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. खड्डे बुजवावे, अशी मागणी आहे. अपघात हाेऊ नये, यासाठी रस्ता दुरुस्ती करावी.

रस्त्यालगतच्या वाहनांवर कारवाई करा

गडचिरोली : गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात अगदी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जातात. या वाहनांवर कारवाई होत नसल्याने वाहने रस्त्यावर लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनांवर कारवाई करण्याची मागणी आहे.

विटा बनविण्याच्या कामास सुरुवात

देसाईगंज : उन्हाळ्याला सुरुवात झाली असल्याने घर बांधकामाला ग्रामीण भागात वेग आला आहे. देसाईगंज तालुक्यात विटांची निर्मिती केली जाते. हिवाळ्यात विटा बनविण्यासाठी पाेषक वातावरण असल्याने विटा बनविण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे.

गोरक्षण संस्थेच्या निर्मितीची मागणी

गडचिरोली : गडचिरोली शहरात गोरक्षण संस्था नाहीत. त्यामुळे अनेकदा बेवारस जनावरे, तसेच कत्तलीसाठी जात असलेले जनावर पकडून चंद्रपूर जिल्ह्यात लोहारा येथे पाठवावे लागतात. गोरक्षण संस्था निर्माण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

जिल्हा परिषदेसमोरील अतिक्रमण हटवा

गडचिरोली : जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजूला काही दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. मात्र या दुकानदारांवर कोणतीही कारवाई बांधकाम विभाग तसेच नगरपरिषद प्रशासन करीत नसल्याने या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जागा पकडून दुकाने थाटली जात आहेत. या परिसरात आता जिल्हा परिषदेकडून शाॅपिंग काॅम्प्लेक्स उभारले जाणार आहे. मात्र, महसूल विभागाच्या जागेवरील अतिक्रमण कायम आहे.

मालेवाडा परिसर समस्यांच्या विळख्यात

कुरखेडा : कोरची व धानोरा या दुर्गम भागांना जोडणारा मालेवाडा परिसर आजही शासन व प्रशासनाच्या नजरेत दुर्लक्षित आहे. या भागात ५० किमीच्या परिसरात केवळ एकाच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भरवशावर आरोग्य सेवा आहे.

पाणंद रस्ते मोकळे करण्याची मागणी

गडचिरोली : शेतीकडे जाणाऱ्या मार्गाला ग्रामीण भागात सगर असे संबोधले जाते. रोजगार हमी योजनेंतर्गत याच रस्त्यांना पाणंद रस्ता म्हटले जाते. या पाणंद रस्त्यांवर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे शेतीकडे जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. सर्व्हे करून या मार्गाचे रोहयोच्या माध्यमातून बांधकाम करणे गरजेचे झाले आहे.

रस्त्यावर आलेली झाडे तोडण्याची मागणी

रांगी : लोहारा ते रांगी, पिसेवडधा ते रांगी या रस्त्यावर अनेक झाडे रस्त्यावर आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना अडचण येते. वनविभागाने या झाडांची तोड करावी, अशी मागणी आहे. मात्र, याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

केरोसीनचा पुरवठा वाढविण्याची मागणी

एटापल्ली : राज्य शासनाने शहरी व ग्रामीण भागासाठी केरोसीनचे परिमान निश्चित केले आहे. केरोसीनचा कोटा कमी झाल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक अडचणीत आले आहेत. दुर्गम भागातील गावांमध्ये वीज राहत नाही. त्यामुळे केरोसीनचा पुरवठा वाढविण्याची मागणी आहे.

याेजनांबाबत जनजागृतीचा अभाव

कुरखेडा : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहितीअभावी नागरिक या योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे तालुकास्तरावर कायमस्वरूपी जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी आहे.

गाळ उपशाअभावी नाल्या तुंबल्या

गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरातील नाल्यांचा उपसा करावा, अशी मागणी होत आहे. कॉम्प्लेक्स परिसर विस्ताराने फार मोठा आहे. त्यामुळे या ठिकाणी जादा मजूर देण्याची मागणी आहे. सध्या नाल्या तुंबल्याने डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे गाळाचा उपसा करावा, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.

आलापल्ली-मार्कंडा रस्त्यावर खड्डे

आलापल्ली : मुलचेरा ते मार्कंडा (कं), आलापल्ली ते मुलचेरा व कोपरअल्ली ते घोट मार्गाची अत्यंत दैन्यावस्था झाली असून, रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा त्रास वाहनधारक व शाळकरी मुलांना करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करा

आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यापूर्वी अनेकदा ही मागणी करण्यात आली; परंतु या मागणीकडे दुर्लक्ष झाले.

अंगणवाड्या भरतात किरायाच्या खोलीत

गडचिरोली : जिल्हाभरातील १०० वर अंगणवाड्यांना स्वत:ची इमारतच नाही. त्यामुळे या अंगणवाड्या किरायाच्या खोलीत भरविल्या जात आहेत. शहरात अत्यंत लहान व कौलारू खोलीत अंगणवाडी चालविली जात आहे. बहुतांश मिनी अंगणवाड्यांना इमारत उपलब्ध नाही.

ठेंगण्या व अरुंद पुलाचा प्रश्न कायमच

गडचिरोली : ब्रिटिशकाळात बांधलेला एकही पूल गडचिरोली जिल्ह्यात नसला तरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर तयार करण्यात आलेला चंद्रपूर-आलापल्ली मार्गावरील आष्टीचा पूल ठेंगणा व अरुंद असल्यामुळे या पुलावरून आजवर अनेकांचा वाहन कोसळून बळी गेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ठेंगणे व अरुंद पूल हे वाहतुकीसाठी ग्रामीण भागात नेहमीच अडचणीचे ठरलेले आहेत.

अंकिसा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील मुख्य मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गावरून आसरअल्लीदरम्यानच्या गावातील नागरिक ये-जा करीत असल्याने या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे या मार्गाची बांधकाम विभागाने दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था

धानोरा : तालुक्यातील खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या प्रवासी निवारा दुरवस्थेत आहे. निर्मितीपासून प्रवासी निवाऱ्याची अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही.

रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात

घोट : शेतीकडे जाणाऱ्या मार्गाला ग्रामीण भागात सगर असे संबोधले जाते. रोजगार हमी योजनेंतर्गत याच रस्त्यांना पाणंद रस्ता म्हटले जाते. या पाणंद रस्त्यांवर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे शेतीकडे जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. सर्व्हे करून या मार्गाचे रोहयोतून बांधकाम करावे, अशी मागणी आहे.

ऑनलाइन सातबारा झाला डोकेदुखी

वैरागड : ऑनलाइन सातबारा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा तलाठी कार्यालयामार्फत पुरवावा, अशी मागणी आहे.

राजनगरी अहेरीत घाणीचे साम्राज्य

अहेरी : स्थानिक नगर पंचायत स्वच्छतेबाबत फारशी आग्रही नाही. अनेक ठिकाणी नाल्यांचे बांधकाम अपूर्ण आहे. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहताना दिसून येत आहे. अहेरी नगरपंचायतीची स्थापना २३ एप्रिल २०१५ रोजी झाली. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर विकासाला गती मिळेल, अशी आशा शहरवासीय बाळगून होते. मात्र, ही अपेक्षा खोटी ठरली आहे.

वराह बंदोबस्त मोहीम सुरू होणार

गडचिरोली : स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्यावतीने २०१७, २०१८ व २०१९ या वर्षात तीनदा मोकाट वराह पकडण्याची मोहीम राबविण्यात आली. मात्र, पुन्हा शहराच्या विविध भागात मोकाट वराहांचा हैैदोस वाढला आहे. पालिकेने वराह पकडण्याची मोहीम सुरू करावी, अशी मागणी आहे.

खड्ड्यांमुळे प्रवाशांना २५ किमीचा फेरा

अहेरी : अहेरी-कन्नेपल्ली मार्गावर खड्डे पडल्याने या मार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, मार्गाच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अहेरी-कन्नेपल्ली मार्ग सोयीचा आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासकीय यंत्रणेकडून कार्यवाही हाेत नसल्याचे दिसून येते.

भिवापूर-आमगाव मार्गाची दुर्दशा

चामोर्शी : तालुक्यातील भिवापूर क्रॉसिंग-आमगाव (महल)-नेताजीनगर हा १५ किमीचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. डांबर निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होत असल्याने या मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे. प्रशासनाने ठाेस नियाेजन करून या मार्गाची पक्की दुरुस्ती करावी, अशी मागणी हाेत आहे.

खासगी वाहनांकडून नियमांचे उल्लंघन

कुरखेडा : शासनाच्या नियमानुसार एसटीच्या बस थांब्यापासून २०० मीटर अंतरावर खासगी वाहनांना उभे ठेवून प्रवासी भरण्यास बंदी असली, तरी कुरखेडा येथे या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. अतिक्रमणामुळे शहरामध्ये वाहतुकीची कोंडी होत आहे.

गोगाव बसथांब्यावर गतिरोधक उभारा

गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावर भरधाव वाहतूक होत असल्याने गोगाव येथील बसथांब्यावर गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गतिरोधकअभावी या ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत.

आरमाेरीत पार्किंगच्या व्यवस्थेचा अभाव

आरमाेरी : शहरातील मुख्य चौकात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यावरच वाहने ठेवतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असून, अपघाताची शक्यताही वाढली आहे. नगरपरिषदेने या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी आहे.

अपंग विवाह अनुदान योजनेची जागृती करा

आष्टी : संपूर्ण महाराष्ट्रात शासनाच्यावतीने अपंग युवक, युवतींसाठी कल्याण विवाह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत अपंग कल्याण विवाह योजना राबविली जाते. मात्र या योजनेची जनजागृती करण्यात येत नसल्याने अनेक अपंग युवक, युवती योजनेबाबत अनभिज्ञ आहेत.

Web Title: Speculation is rampant in many wards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.