अधिकचा खर्च टाळून साेयाबिनची लागवड करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:34 IST2021-05-01T04:34:58+5:302021-05-01T04:34:58+5:30

सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा ...

Soybean should be planted avoiding extra cost | अधिकचा खर्च टाळून साेयाबिनची लागवड करावी

अधिकचा खर्च टाळून साेयाबिनची लागवड करावी

सोयाबीन हे स्वपरागसिंचीत पीक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील २ वर्षांपर्यंत वापरात येते. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादनखर्च कमी होईल. मागील दोन वर्षांत शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यांपासून उत्पादित झालेले सोयाबीन बियाणे चालूवर्षी बियाणे म्हणून शेतकरी पेरणीसाठी वापरू शकतात तसेच ग्रामबीजोत्पादन, पीक प्रात्याक्षिके योजनांतर्गत आलेल्या उत्पन्नातून बियाण्यांची निवड करता येते. प्रमाणित बियाण्यांच्या उत्पादनातून चाळणी करून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची बियाणे म्हणून निवड करावी. सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजूक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते. त्यामुळे त्याची उगवण क्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळताना काळजी घ्यावी. बियाण्यांची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. साठवणुकीसाठी प्लास्टिक पोत्यांचा वापर करू नये. बियाणे साठवताना त्याची थप्पी ७ फुटांपेक्षा जास्त उंच असणार नाही याची काळजी घ्‍यावी. बियाणे हाताळताना जास्त प्रमाणात आदळआपट होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रति हेक्टरी बियाणे दर ७५ किलोवरून ५० ते ५५ किलोवर आणण्यासाठी टोकन पद्धतीने किंवा प्लँटरचा वापर करून पेरणी करावी. सोयाबीनची उगवण क्षमता ७० टक्क्यांपेक्षा कमी असल्यास उगवण क्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे, असा सल्ला ‘आत्मा’ने दिला आहे.

बाॅक्स

अशी करावी बीज प्रकिया

७५ ते १०० मि. मी. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. बियाण्याची पेरणी ३ ते ४ सेंटिमीटर खोलीपर्यंत करावी. पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरमची बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी बीज प्रक्रिया करावी. रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी २०० ते २५० ग्रॅम प्रती १० ते १५ किलो बियाण्यांस पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवावी व नंतर त्याची पेरणी करावी.

Web Title: Soybean should be planted avoiding extra cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.