खरीप पेरणीपूर्वी स्वच्छता करून शेत तणविरहित करा
By Admin | Updated: May 23, 2015 02:06 IST2015-05-23T02:06:14+5:302015-05-23T02:06:14+5:30
शेतकऱ्यांसाठी मे महिना शेतीच्या पूर्व हंगामाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून या महिन्यात धानाच्या रोपवाटिकेची नांगरणी, ....

खरीप पेरणीपूर्वी स्वच्छता करून शेत तणविरहित करा
मान्सूनपूर्व बैठक : एस. एल. बोरकर यांचे शेतकऱ्यांना आवाहन
चामोर्शी : शेतकऱ्यांसाठी मे महिना शेतीच्या पूर्व हंगामाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून या महिन्यात धानाच्या रोपवाटिकेची नांगरणी, वखरणी करून पेरणीकरिता रोपवाटिका तयार कराव्यात, घरात साठविलेले बियाणे स्वच्छ करून पेरणीपूर्वी मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करून निकृष्ट बियाणे बाजुला करावे व निरोगी बियाण्यास थायरम/बावीस्टीन तीन ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चोळून नंतर रोपवाटिकेत पेरणी करावी, शेतावर असलेले तणसाचे ढीग, कुटार, गव्हांडा तसेच इतर पिकांचे अवशेष स्वच्छ करून शेत तणविरहीत ठेवावे, असे प्रतिपादन पीक संरक्षण विषयाचे तज्ज्ञ डॉ. एस. एल. बोरकर यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र गडचिरोलीच्या वतीने मान्सूनपूर्व मेळावा तालुक्यातील वागदरा येथे २० मे रोजी घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. पी. लांबे होते. प्रमुख अतिथी म्हणून पीक संरक्षण विषयतज्ज्ञ डॉ. एस. एल. बोरकर, कृषी अभियांत्रिकी तज्ज्ञ प्रा. एस. एस. कऱ्हाळे, कृषी विज्ञान शाखेचे प्रा. डी. एन. अनुकार, वागदराचे पोलीस पाटील आनंदराव कुळमेथे, ग्रा. पं. सदस्य भोजराज पेंदोर आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. लांबे यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरील विविध कृषीविषयक उपक्रमाची शेतकऱ्यांनी पाहणी करावी, असे आवाहन शेतकऱ्यांना केले. प्रा. अनुकार यांनी कंपोस्ट खत, गांढूळ खत याचा वापर शेतीत वाढवावा, धान लागवडीकरिता लवकर, मध्यम व उशिरा येणाऱ्या धान वाणाची माहिती उपस्थितांना दिली. प्रा. कऱ्हाळे यांनी शेती मशागतीसाठी यंत्राचा वापर करण्याबाबतचे महत्त्व विषद केले.
कार्यक्रमाचे संचालन कृषी सहायक नितीन मुद्दमवार यांनी तर आभार कृषिमित्र अनिल अल्लेलवार यांनी मानले. या कार्यक्रमाला ६५ शेतकरी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)