१० हजार हेक्टरवर पेरणी

By Admin | Updated: July 5, 2015 01:36 IST2015-07-05T01:36:49+5:302015-07-05T01:36:49+5:30

जिल्ह्यातील एकूण १ लाख ६६ हजार हेक्टरपैकी १० हजार ५६७ हेक्टरवर धानाचे पऱ्हे व इतर खरीप पिकांची पेरणी १ जुलैपर्यंत करण्यात आली ...

Sowing at 10 thousand hectares | १० हजार हेक्टरवर पेरणी

१० हजार हेक्टरवर पेरणी

गडचिरोली : जिल्ह्यातील एकूण १ लाख ६६ हजार हेक्टरपैकी १० हजार ५६७ हेक्टरवर धानाचे पऱ्हे व इतर खरीप पिकांची पेरणी १ जुलैपर्यंत करण्यात आली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन धान पिकाचे घेतले जाते. यावर्षीच्या खरीप हंगामात सुमारे १ लाख ४९ हजार २८३ हेक्टरवर धान पिकाची लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. त्यानुसार बियाणे व खते वेळेवर उपलब्ध होतील, यादृष्टीनेही कृषी विभागाने पूर्वीपासूनच नियोजन केले होते. योग्य नियोजनामुळे शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे उपलब्ध झाले.
१ जुलैपर्यंत सुमारे ५ हजार ५७८ हेक्टरवर धान पिकांच्या पऱ्ह्यांची लागवड करण्यात आली आहे. १० पटीच्या तुलनेत पऱ्हे टाकले जात असल्याने सदर पऱ्यांच्या सहाय्याने ५५ हजार ७०० हेक्टरवर धान पिकाची रोवणी होऊ शकणार आहे. ७ हजार १८० हेक्टरवर आवत्या पध्दतीने धान पिकाची लागवड करण्यात आली आली आहे.
पावसाळ्याच्या अगदी सुरूवातीला चार दिवस मुसळधार पाऊस कोसळला होता. त्यामुळे जमिनीत प्रचंड प्रमाणात ओलावा निर्माण झाला होता. ओलावा असताना पिकांची पेरणी करणे शक्य होत नाही. १ जुलैपर्यंत जमीन ओलीच असल्याने शेतकऱ्यांनी पाहिजे त्या प्रमाणात धान पिकाचे पऱ्हे टाकले होते. त्याचबरोबर इतर पिकांचीही पेरणी केली नाही. १ जुलैनंतर मात्र पावसाने उसंत घेतल्याने पेरणीला वेग आला आहे. मागील चार दिवसांच्या कालावधीत बहुतांश पेरण्या आटोपल्या असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. (नगर प्रतिनिधी)
रोवणीला सुरूवात
ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनी पावसाची वाट न बघता सुरूवातीलाच पऱ्हे टाकले होते. अशा शेतकऱ्यांचे पऱ्हे आता रोवणीस तयार झाले असल्याने रोवणीचे काम सुरू झाले आहे. गडचिरोली तालुक्यात १ जुलैपर्यंत सहा हेक्टर व मुलचेरा तालुक्यात दोन हेक्टरवर पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. प्रत्यक्षात बहुतांश तालुक्यात काही शेतकऱ्यांनी रोवणीला सुरूवात केली आहे.
१:१० प्रमाणात पऱ्ह्यांची पेरणी
धानाचे सर्वप्रथम पऱ्हे टाकले जातात. त्यानंतर त्याची रोवणी केली जाते. पऱ्हे व रोवणीचे प्रमाण १:१० एवढे ठेवले जाते. म्हणजेच एक हेक्टर क्षेत्रावरील पऱ्ह्यांच्या सहाय्याने १० हेक्टर क्षेत्रावर रोवणी करता येणे शक्य होते. त्यामुळे पेरणीची आकडेवारी सुरूवातीला कमी दिसून येते.

Web Title: Sowing at 10 thousand hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.