शेतकरी साहित्य संमेलनाचे सूप वाजले

By Admin | Updated: February 27, 2017 01:16 IST2017-02-27T01:16:09+5:302017-02-27T01:16:09+5:30

तिसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन गडचिरोली येथील युगात्मा शरद जोशी साहित्य नगरी सांस्कृतिक सभागृहात शनिवारपासून आयोजित करण्यात आले होते.

The soup of farmer's literature conference was held | शेतकरी साहित्य संमेलनाचे सूप वाजले

शेतकरी साहित्य संमेलनाचे सूप वाजले

साहित्यिकांची मांदियाळी : शेतकऱ्यांच्या समस्यांवर विचारमंथन
गडचिरोली : तिसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन गडचिरोली येथील युगात्मा शरद जोशी साहित्य नगरी सांस्कृतिक सभागृहात शनिवारपासून आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात वाढत चाललेल्या शेतकरी आत्महत्या, त्याला कारणीभूत सरकारचे धोरण, कृषी नितीच्या अंमलबजावणीचा अभाव यासह शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर व विषयांवर विचारमंथन करण्यात आले. या संमेलनाचा समारोप रविवारी साहित्यिकांच्या उपस्थितीत करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते वामनराव चटप होते. मंचावर ज्येष्ठ साहित्यीक प्रा. डॉ. शेषराव मोहिते, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, अनिल घनवट, शैलजा देशपांडे, राजेंद्रसिंह ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. सदर साहित्य संमेलनात ‘भारतीय शेतीची पराधिनता’, स्वामीनाथन आयोग आणि मुक्त अर्थव्यवस्था, शेतकरी विरोधी कायद्याचा परिचय, शेतकरी आत्महत्यांच्या राज्यात शेतकरी यशोगाथांचे गौडबंगाल आदी विषयांवर परिसंवाद घेण्यात आले. याशिवाय शेतकरी कवी संमेलन, प्रकट मुलाखत, मुलाखतीचा कार्यक्रमही घेण्यात आला. याप्रसंगी आता पेटवू सारे रान या समारोपीय सत्रात अ‍ॅड. वामनराव चटप यांनी सद्य स्थितीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कशी दयनिय अवस्था झाली आहे, त्याची कारणे कोणती, शेतकरी आत्महत्या वाढीस शासनाचे शेतकरी विरोधी धोरण कसे जबाबदार आहे, विदर्भातील शेतकऱ्यांवर सरकारकडून अन्याय होत आहे. या साऱ्या बाबी अत्यंत पोटतिडकीने मांडल्या. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळण्यासाठी नव्या मार्गाने मोठे आंदोलन करण्याची गरज आहे, असे चटप यांनी सांगितले. समारोपीय कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्यातील नवोदित कवी, साहित्यीक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

लोकगीत समाजाचा आरसा आहे - सुमिता कोेंडबत्तुनवार
लोक परंपरा, लोक संस्कृती, कादंबरी तसेच लोकगीतात शेतकऱ्यांचे दु:ख लपले आहे. शेतकऱ्यांचे जीवन पूर्वीप्रमाणे आजही अतिशय दु:खमय आहे. शेतकऱ्यांच्या दु:खाला सीमा नाही. लोकगीत खऱ्या अर्थाने समाजाचा आरसा आहे. पारंपरिक कथा व लोकगीतातून ग्रामीण भागातील स्त्रित्वाचे वास्तव दर्शन होते, असे प्रतिपादन नागपूर येथील साहित्यीक तथा शिक्षिका डॉ. सुमिता कोंडबत्तुनवार यांनी केले. पारंपरिक कथा-लोकगीते : ग्रामीण स्त्रित्वाचे वास्तव दर्शन या विषयावर आयोजित परिसंवादात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी मंचावर प्रज्ञा बापट, वसुंधरा काशीकर (भागवत), गीता खांडेभराड, अनिल घनवट आदी मान्यवर उपस्थित होते. या परिसंवाद सत्राचे प्रास्ताविक व संचालन सीमा नरोडे यांनी केले. याप्रसंगी डॉ. कोंडबत्तुनवार यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील लोककला व लोकगीतांचे सविस्तरपणे विवेचन केले. याप्रसंगी त्यांनी अनेक प्रकारची लोकगीते सादर करून ग्रामीण भागातील स्त्रीयांचे जीवन कसे आहे, हे उलगडून दिले. शेतीचे काम येणारी मुलगी जीवनात कधीही सरस ठरते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलींनी स्वत:ला कमी समजू नये. त्यांच्यात गुणवत्ता आहे, असे त्यांनी सांगितले.

 

Web Title: The soup of farmer's literature conference was held

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.