गडचिरोली - लाडक्या गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच गडचिरोलीत जिल्हा पोलिसांचे सी-६० पथक व राज्य राखीव पोलिस दलाच्या शीघ्र कृती दलाच्या जवानांनी मोठी कारवाई करत नक्षलवाद्यांचा घातपाताचा मोठा कट उधळून लावला. भामरागड तालुक्यात छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगलात २५ ऑगस्ट रोजी पहाटे उभय पथकांच्या संयुक्त मोहिमेत झालेल्या आठ तासांच्या धुमश्चक्रीत चार जहाल नक्षली ठार झाले. यात एक पुरुष व तीन महिला नक्षलींचा समावेश आहे. घटनास्थळावरून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला.
गडचिरोली-नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात गडचिरोली विभागाच्या गट्टा दलम, कंपनी क्रमांक १० व इतर माओवादी दबा धरून बसले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळाली होती.
जिल्हा वर्धापनदिनी होता घातपाताचा कटदरम्यान, २६ ऑगस्ट रोजी कोपर्शी जंगल परिसरात माओवादी तळ ठोकून बसले होते. गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती होऊन २६ ऑगस्ट रोजी ४३ वर्षे पूर्ण झाली. जिल्हा वर्धापनदिनाच्या दिवशी सुरक्षा यंत्रणांना हानी पोहोचविण्यासाठी घातपाती कारवाईचा माओवाद्यांचा कट असण्याची शक्यता आहे. मात्र, हा डाव जवानांनी मोठ्या हिमतीने उधळून लावला.