एटापल्ली तालुक्यातील सौरदिवे नादुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:38 IST2021-05-12T04:38:43+5:302021-05-12T04:38:43+5:30
एटापल्ली : अतिदुर्गम भागात असलेल्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावात सौरदिवे लावण्यात आले. परंतु अनेक गावात लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त ...

एटापल्ली तालुक्यातील सौरदिवे नादुरुस्त
एटापल्ली : अतिदुर्गम भागात असलेल्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावात सौरदिवे लावण्यात आले. परंतु अनेक गावात लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त अवस्थेत आहेत. सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने सौरदिवे बेकामी झाले आहेत.
सुबाभूळ लागवडीसाठी अनुदान द्या
धानोरा : सुबाभूळ लागवडीकरिता शेतकऱ्यांना कृषी व वनविभागाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होतो. त्यामुळे स्थानिक स्तरावरून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन अनुदान द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शेतकऱ्यांसाठी ही बाब फायदेशीर राहणार आहे.
कुरखेडातील नळ जोडणीची तपासणी करा
कुरखेडा : शहरातील अनेक वॉर्डांमध्ये घरगुती नळाला मोटारपंप लावून वरच्या मजल्यावर सर्रास पाणी खेचले जात आहे. यामुळे इतर नागरिकांच्या नळाला पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नळजोडणीची तपासणी करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.
आवश्यकतेच्या ठिकाणी विद्युत खांब द्या
धानोरा : तालुक्यातील चव्हेला, मुंगनेर येथे वाढीव विद्युत खांब लावून वीजपुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. परंतु वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील काही भागात रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पसरते.
गोकुलनगर वस्तीत सुविधांचा अभाव
गडचिरोली : गडचिरोली नगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या गोकुलनगर लगत माता मंदिराच्या पलीकडे अनेक घरांची वस्ती गेल्या काही वर्षांपासून वसली आहे. अनेक कुटुंब या भागात वास्तव्यास आहेत. मात्र सदर भागात पक्के रस्ते, नाली, पथदिवे आदी मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे.
तलाठी व ग्रामसेवकांची वानवाच
एटापल्ली : अहेरी उपविभागाच्या एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा व अहेरी या पाचही तालुक्यांत महसूल विभागांतर्गत येणाऱ्या तलाठी व ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त आहेत. परिणामी नागरिकांची कामे खोळंबतात.
व्हॉल्व्ह दुरुस्त करण्याची मागणी
गडचिरोली : मुख्य पाइपलाइन तसेच पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या पाइपलाइनवर अनेक ठिकाणी व्हॉल्व्ह बसविण्यात आले आहेत. मात्र यातील अनेक व्हॉल्व्ह लिकेज असल्याने पाण्याची गळती होत राहते. परिणामी संबंधित टाकीमध्ये कमी पाणी जमा होते. सदर व्हॉल्व्ह दुरुस्तीची मागणी आहे. गडचिरोली पोलिकेअंतर्गत गेल्या अनेक वर्षांपासूनची जुनी पाइपलाइन शहरात कायम आहे.
लोहारा मार्गावरील झाडे तोडण्याची मागणी
आरमोरी : लोहारा ते रांगी, पिसेवडधा ते रांगी या रस्त्यावर अनेक झाडे रस्त्यावर आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना अडचण येते. वनविभागाने या झाडांची तोड करावी, अशी मागणी आहे. मोठे वाहन आल्यास रस्त्याच्या बाजूच्या झुडपांमुळे दुचाकी वाहनधारकांना अडचण निर्माण होते. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची मागणी होत असली तरी याकडे दुर्लक्ष आहे.
मुद्रांक विक्रीकडे लक्ष देण्याची मागणी
गडचिरोली : स्थानिक तहसील कार्यालयाच्या परिसरात परवानाधारक विक्रेत्यांकडून १०० रुपयांचे मुद्रांक ११० रुपये व त्यापेक्षा अधिक किमतीचे मुद्रांक जादा किमतीला विकले जात आहे. यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत आहे, याकडे तहसीलदारांनी लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.
मत्स्यपालनासाठी कर्ज उपलब्ध करा
गडचिरोली : अनेक शेतकऱ्यांनी शेततळे खोदले असून, या शेततळ्यांमध्ये मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला आहे. यामध्ये महिला बचतगटांचाही समावेश आहे. शेतकरीवर्ग आपापल्यास्तरावर शेतखड्ड्यांमध्ये मत्स्यपालन करीत आहेत. या नागरिकांना कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
वडसात स्वच्छतागृहांची संख्या वाढली
देसाईगंज : सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने जनतेने स्वत:हून काही ठिकाणी अघोषित स्वच्छतागृह तयार केली आहेत. ज्यामध्ये रस्त्याच्या कडेला, बाजारपेठेतील मोकळी जागा, बसस्टॉपकडील मार्गाच्या जागेवर वाहने ठेवतात.