सिरोंचा : वीज नसलेल्या दुर्गम गावांत उजेड पाडण्यासाठी प्रशासनाने दोन ते तीन वर्षांपासून शासनाच्या निधीतून सौर पथदिवे लावले. पथदिव्याच्या बॅटऱ्यांमध्ये बिघाड निर्माण झाला आहे.
वसतिगृह निर्मिती करा
आरमोरी : आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे मुलांचे वसतिगृह नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना इतर वसतिगृहांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे वसतिगृह निर्माण करावे, अशी मागणी आहे.
खुल्या जागा कुचकामी
देसाईगंज : नगरपालिका क्षेत्रात अनेक वाॅर्डांमध्ये खुल्या आहेत. मात्र, काही मोजक्याच खुल्या जागांना संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या खुल्या जागांना संरक्षक भिंत नाही. तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते.
जप्तीची वाहने पडूनच
चामोर्शी : अपघात झाल्याने काही प्रमाणात मोडलेली वाहने अपघातानंतरच्या न्यायालयीन प्रकरणांमुळे, कागदपत्रांअभावी पोलीस ठाण्यातच ठेवली आहेत. ही वाहने बाहेरच असल्याने ती भंगार झाली आहेत. वाहने लिलाव केल्यास गरजू व्यक्तींना मिळतील.
दिभना मार्गाचे रुंदीकरण करा
गडचिरोली : वनविभागाचा नाका ते दिभना मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गाची सध्या दुरवस्था झाली असल्याने दुरुस्तीसह रुंदीकरण करावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.
फवारणी न झाल्याने डासांचा प्रादुर्भाव
अहेरी : आरोग्य विभागाच्या वतीने गावागावांत फवारणी न झाल्याने यंदा डासांचा प्रादुर्भाव अधिक वाढणार आहे. सध्या डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. आलापल्ली शहरात नाल्यांचा उपसाही नियमित हाेत नाही.
माहिती केंद्र निर्माण करण्याची मागणी
काेरची : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहितीअभावी नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे तालुकास्तरावर कायमस्वरूपी जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून हाेत आहे.
ग्राहकांना मिळते बनावट बिल
गडचिरोली : प्रत्येक ग्राहकाला जीएसटी क्रमांक असलेले बिल देणे गरजेचे असतानाही काही अपवादात्मक दुकानदार वगळता बहुतांश दुकानदार डुप्लिकेट बिल देऊन फसवणूक करीत आहेत. शहरी भागातील अनेक दुकानदार जीएसटी क्रमांक नसलेले बनावट बिल ग्राहकांना देत आहेत.
दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण करावे
अहेरी : केंद्र व राज्य शासनाने दिव्यांगांच्या हितासाठी अनेक योजना तयार केल्या आहेत. मात्र, तालुक्यात योजनांची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे दिव्यांग विकासापासून वंचित आहेत. प्रशासनाने दिव्यांगांचे सर्वेक्षण करून विकास योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी परिसरातील दिव्यांग व्यक्तींकडून करण्यात येत आहे.
हागणदारी मुक्तीवर प्रश्नचिन्ह
देसाईगंज : बहुतांश नागरिकांकडे शौचालय आहे. मात्र ग्रामीण भागातील नागरिक शौचालयाचा वापरच करीत नाहीत. परिणामी, शौचालयाचा वापर न झाल्याने हागणदारीमुक्त गाव निर्माण करणे अडचणीचे झाले आहे. घरी शाैचालय असूनही ग्रामीण भागातील वयाेवृद्ध, जुन्या विचाराचे लाेक बाहेर शाैचास जात आहेत.
बसस्थानकाचा प्रश्न अद्यापही प्रलंबितच
चामाेर्शी : तालुक्याची निर्मिती होऊन अनेक वर्षांचा कालावधी लोटला. लाेकप्रतिनिधींनी बसस्थानक उभारू, अशी ग्वाही दिली. अद्यापही हा प्रश्न निकाली निघाला नसल्याने नाराजी आहे.
ग्रामीण भागात वीजचोरी वाढली
गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र वीजचोरीचा भुर्दंड इतर नागरिकांना सहन करावा लागत आहे. दुर्गम व ग्रामीण भागांत कार्यक्रमांदरम्यान विजेच्या तारांवर आकडा टाकून वीजचोरी केली जात आहे.
बांबू मिळत नसल्याने कामगार अडचणीत
गडचिराेली : तालुक्यात बुरुड कामगारांची संख्या बरीच आहे. मात्र, वन विभागाकडून निस्तार हक्काद्वारे पुरेसा बांबू मिळत नाही. त्यामुळे कारागीर व शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वनविभागाने ही समस्या सोडवावी, अशी मागणी बुरुड बांधवांकडून होत आहे.
कुंभार समाजासाठी मंडळ स्थापन करावे
अहेरी : कुंभार समाजासाठी संत गोरोबाकाका माती कला बोर्डाची स्थापना करावी, कुंभार समाजाचा एनटी प्रवर्गात समावेश करावा, मातीवर आकारली जाणारी रॉयल्टी संपूर्ण माफ करावी, वाहतूक व वीटभट्टी परवान्यातील जाचक अट रद्द कराव्यात, कुंभार समाजाला ओळखपत्रावर परवाना व जळाऊ लाकूड देण्याची मागणी कुंभार समाज महासंघाने केली आहे.
रेडिअमअभावी अपघाताची शक्यता
कुरखेडा : जिल्ह्यातील अनेक वळणरस्त्यावर रेडिअम लावले नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे वाहनचालकांना रात्रीच्या वेळी समोरील रस्ता दिसत नाही.
जंगलव्याप्त परिसरात फिरणे टाळा
गडचिराेली : पहाटेच्या सुमारास फिरायला गेलेले अनेकजण वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले असल्याच्या घटना घडत आहेत. त्या टाळण्यासाठी जंगलव्याप्त परिसरात अंधाराच्या वेळेस फिरायला जाणे टाळावे, असे आवाहन वनविभागातर्फे केले आहे.
दुरुस्तीअभावी तलावांची दुरवस्था
चामाेर्शी : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय कमी आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरुस्ती केली जात नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावरच शेती करावी लागत आहे. सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेला मामा तलाव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
अनेक वाॅर्डातील नाल्यांची दुरवस्था
गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाली खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नालींवर कोणतेच आच्छादन नसल्याने किरकोळ अपघात घडताहेत.
मोहलीचा मनाेरा ठरताेय कुचकामी
धानोरा : तालुक्यातील मोहलीमध्ये बीएसएनएलचा मनोरा आहे; परंतु त्याची क्षमता कमी असल्याने दुर्गम परिसरातील ग्राहकांना याचा लाभ होत नाही. मोहली, दूधमाळा, गिरोला, गोडलवाही, आदी ठिकाणी भ्रमणध्वनी मनोरे नाहीत. त्यामुळे मोहली येथील मनोऱ्याची रेंज वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्मशानभूमींची दुरवस्था वाढली
कुरखेडा : जिल्हा परिषदेच्या प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली तरी, ग्रामीण भागातील अनेक गावांतील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही.
मामीडीताेगूजवळ पूल बांधण्याची मागणी
झिंगानूर : झिंगानूर ते सिरकोंडा या मुख्य रस्त्यावर मामीडीतोगू नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पूल नसल्याने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प होते.