वीज टॉवरच्या उभारणीसाठी मौल्यवान झाडांची कत्तल
By Admin | Updated: October 16, 2016 00:58 IST2016-10-16T00:58:50+5:302016-10-16T00:58:50+5:30
चंद्रपूरवरून छत्तीसगड राज्यातील भिलाई येथे जाणाऱ्या वीज टॉवर उभारणीसाठी देसाईगंज, कुरखेडा व कोरची ..

वीज टॉवरच्या उभारणीसाठी मौल्यवान झाडांची कत्तल
रेडिएशनचा त्रास वाढणार : शेकडो हेक्टरवरील जंगल धोक्यात
कोरची : चंद्रपूरवरून छत्तीसगड राज्यातील भिलाई येथे जाणाऱ्या वीज टॉवर उभारणीसाठी देसाईगंज, कुरखेडा व कोरची तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील मौल्यवान झाडांची कत्तल केली जात आहे. यामध्ये कोट्यवधी रूपयांची वनसंपदा नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
यापूर्वी कोरची तालुक्यातून तीन समांतर वीज टॉवर लाईन गेली आहे. त्याच्या बाजुला आणखी एक लाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. ही लाईन जेथून जात आहे, त्या लाईनमधून ५०० ते ७०० मीटर रूंदीच्या पट्ट्यातील झाडांची तोड केली जात आहे. पुन्हा दोन ते तीन लाईन या ठिकाणावरूनच जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून सांगितली जात आहे. सहा ते सात समांतर लाईन गेल्यास दोन किमी रूंदीच्या पट्ट्यातील संपूर्ण झाडे तोडली जाण्याची शक्यता आहे. यामुळे या परिसरातील ३० टक्के वनसंपदा नष्ट होण्याचा धोका आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचे काम जंगल तोडीला परवानगी न मिळाल्यामुळे पूर्ण होऊ शकले नाही.
त्याचबरोबर नवीन प्रकल्प, रस्ते, तलाव, विद्युतची कामेसुद्धा रखडली आहेत. मात्र वीज लाईन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेण्यासाठी शेकडो किमी अंतरावरील वनसंपदा तोडली जात आहे. याला परवानगी कशी काय देण्यात आली, असा प्रश्न कोरची तालुक्यातील जनतेकडून उपस्थित केला जात आहे.
ग्रामसभेला सर्वोच्च अधिकार दिले असल्याचे सांगितले जात असले तरी एकाही गावाच्या ग्रामसभेची परवानगी घेण्यात आली नाही. अनेक गावांचा या टॉवर लाईनला विरोध असतानाही स्थानिक आदिवासींवर दबाव टाकून काम पुढे रेटले जात आहे. या टॉवर लाईनमुळे हजारो कुटुंब भूमीहीन होण्याची शक्यता आहे.
सदर टॉवर लाईनमधून ११ हजार मेगावॅट विद्युत प्रवाह राहणार असून येथील रेडिएशनचा धोका परिसरातील मानव व इतर प्राण्यांनाही होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)