गुळगुळीत रस्त्यांवरच डांबराचा थर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 22:23 IST2018-01-14T22:23:04+5:302018-01-14T22:23:16+5:30
तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असताना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून चांगल्या स्थितीतीलच रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम केले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गुळगुळीत रस्त्यांवरच डांबराचा थर
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असताना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून चांगल्या स्थितीतीलच रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम केले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चामोर्शी- आष्टी मार्गावरील अनखोडा गावाच्या अलिकडे चंदनखेडी फाटा येते. चंदनखेडीपर्यंतचा दोन किमीचा रस्ता अतिशय सुस्थितीत होता. अगदी काही ठिकाणीच थोडेफार खड्डे पडले आहेत. त्यामुळे किमान दोन वर्ष या रस्त्याची दुरूस्ती झाली नसती तरी चालले असते. मात्र मुख्यमंत्री सडक योजनेतून या रस्त्याची निवड करण्यात आली. त्यासाठी निधी मंजूर करून कामही पूर्ण करण्यात आले. अगोदरच चांगल्या स्थितीत असलेल्या मार्गावर केवळ थोडाफार मुलामा टाकून काम उरकण्यात आले आहे. अगोदरच मार्गाची चांगली स्थिती असतानाही सदर मार्ग कसा काय मंजूर करण्यात आला, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
तालुक्यातील अनेक मार्गांची अवस्था अंत्यंत वाईट आहे. काही मार्गांवर मागील दहा वर्षांपासून साधे मुरूमसुद्धा पडले नाही. दहा वर्षांत डांबर पूर्णपणे निघून गेल्याने केवळ माती व गिट्टी शिल्लक आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. अशा मार्गांची दुरूस्ती करण्यास प्राधान्य देणे आवश्यक असतानाही केवळ कमिशनपोटी मुख्यमंत्री सडक योजनेचे प्रशासन चांगल्या रस्त्यांवर डांबरचा मुलामा देण्याचे काम करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
तालुक्यातीलच चामोर्शी-भिवापूर-वालसरा हा मार्ग अतिशय खड्डेमय आहे. मात्र सदर मार्ग दुरूस्तीसाठी मंजुरी दिली नाही. या मार्गावरील गावांमधील वाहनधारक कमालीचे त्रस्त असतानाही सदर मार्ग प्रशासनाला दिसत नाही काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुख्यमंत्री सडक योजनेच्या नियमांची ऐसीतैशी
ज्या गावांमधील रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. अशा गावांमधील रस्ते दुरूस्तीला प्राधान्य मिळावे या मुख्य उद्देशाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मागील तीन वर्षांपासून राज्यात सुरू करण्यात आली आहे. मात्र ग्राम सडक योजनेच्या या मुख्य उद्देशालाच हरताळ फासून कमिशनपोटी ज्या रस्त्यांची स्थिती अतिशय चांगली आहे. असे मार्ग मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत नियोजनात घेतले जात आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. चांगल्या रस्त्यावर डांबर अंथरले जात असेल तर इतर योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत फरक काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकीकडे मार्ग दुरूस्तीसाठी नागरिक शासनाकडे निवेदन पाठवितात. मात्र निधी नसल्याचे कारण सांगून रस्त्याची दुरूस्ती केली जात नाही. तर दुसरीकडे चांगला मार्ग दुरूस्त केला जातो. याचा अर्थ मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी व्यवस्थित नियोजन करीत नसल्याचे दिसून येते. जिल्हाधिकाºयांनी स्वत: लक्ष घालून रस्त्यांची निवड करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.