क्रिमिलेअरमधून कुणबी जातीला वगळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:07 IST2017-10-26T00:07:31+5:302017-10-26T00:07:45+5:30
क्रिमिलेअरच्या तत्त्वातून कुणबी जातीला वगळण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय कुणबी समाज संघटना व युवा कुणबी महासंघ तालुका देसाईगंजच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ....

क्रिमिलेअरमधून कुणबी जातीला वगळा
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : क्रिमिलेअरच्या तत्त्वातून कुणबी जातीला वगळण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय कुणबी समाज संघटना व युवा कुणबी महासंघ तालुका देसाईगंजच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
यासंदर्भात दोन्ही संघटनांचे पदाधिकारी व कुणबी समाजबांधवांनी बुधवारी थेट देसाईगंजच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ठेंगरे, डॉ. प्रा. हितेंद्र धोटे, धनपाल मिसार, मारोती बगमारे, लोकमान्य बरडे, ज्ञानेश्वर कवासे, राजेंद्र बुल्ले, किशोर कुथे, एकनाथ पिलारे, शामराव तलमले, मनोज ढोरे, सदाराम ठाकरे यांच्यासह देसाईगंज तालुक्यातील बहुसंख्य कुणबी बांधव उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्टÑ राज्य मागावर्गीय आयोगाने तयार केलेल्या अहवालातील घोषणेनुसार राज्यातील १०३ जातींना क्रिमिलेअरच्या तत्त्वातून वगळण्यात आले आहे. मात्र या अहवालात कुणबी या जातीचा उल्लेख नाही. त्यामुळे कुणबी समाजावर अन्याय झाला आहे. कुणबी समाज हा अनेक पोटजातीत विखुरला असून महाराष्टÑात पूर्वीपासून शेतीशी निगडीत समाज असल्याने हा समाज आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. शेती हा कुणबी समाजाचा पूर्वापार चालत आलेला व्यवसाय आहे. अद्यापही कुणबी समाजाची फारशी प्रगती झाली नाही. शासनाकडून या समाजावर अन्याय होत असून शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे महाराष्टÑात सन २०१४ ते २०१६ या कालावधीत ३ हजार ८८१ शेतकरी आत्महत्या झाल्या. यात विदर्भातील ३० टक्के शेतकरी कुणबी समाजातील आहे. मराठवाड्यातील १६ टक्के कुणबी समाजातील शेतकºयांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यामुळे या समाजाला न्याय देण्यासाठी क्रिमिलेअरची अट शिथिल करून या अटीतून कुणबी समाजाला वगळण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शिष्टमंडळाने एसडीओंशी चर्चा केली.