Six lakh domestic liquor seized | सहा लाखांची देशी दारू जप्त
सहा लाखांची देशी दारू जप्त

ठळक मुद्देस्कुटरसह ७२ पेट्या पकडल्या । स्थानिक गुन्हे शाखेची फोकुर्डी-नवेगाव मार्गावरील कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने चामोर्शी तालुक्यात फोकुर्डी-नवेगाव मार्गावर सापळा रचून आरोपींकडून एकूण ५ लाख ७६ हजार रुपये किमतीची देशी दारू शनिवारी पकडली. या प्रकरणी सोमेश्वर बालाजी गोहणे (४५) रा.फोकुर्डी याला अटक करण्यात आली आहे.
१५ नोव्हेंबर रोजी शनिवारला स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दारू रेड गस्तीवर होते. गडचिरोली शहरात चामोर्शी तालुक्यातून काही ठोक दारू पुरवठादार दारूची आयात करणार असल्याची माहिती मिळाली. फोकुर्डी येथील दारूविक्रेता सोमेश्वर गोहणे यांच्याशी संगमत करून त्यांच्याच मालकीच्या घरी दारू साठवून ठेवल्याची माहिती मिळाली. सदर दारू चामोर्शी तालुक्यातील चिल्लर दारूविक्रेत्यांना घरपोच पुरवठा होणार असल्याची माहिती मिळाली. सदर माहिती अपर पोलीस अधीक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग व पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकण्यासाठी नियोजन करण्यात आले. फोकुर्डी-नवेगाव मार्गावरील सोमेश्वर गोहणे यांच्या मालकीचे बांधकाम सुरू असलेल्या नवीन इमारतीसमोर सापळा रचण्यात आला. हालचालीवर पाळत ठेवून असताना रविवारच्या रात्री ३ वाजता सोमेश्वर गोहणे हा त्यांच्या ताब्यातील एमएच-३३-यू-२०२० क्रमांकाच्या स्कुटीवर एका प्लास्टिकच्या चुंगडीमध्ये देशी दारूचे तीन बॉक्स मांडले.
सदर २४ हजार रुपये किमतीची दारू चिल्लर विक्रेत्यांना घरपोच पोहोचता करीत असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांच्या मालकीच्या सुरू असलेल्या नवीन इमारतीत जाऊन झडती घेतली असता, तेथे दारूच्या पेट्या आढळून आल्या. त्याचेकडून एकूण ५ लाख ७६ हजार रुपये किमतीच्या देशी दारूच्या ७२ पेट्या जप्त करण्यात आल्या. या पेट्यांमध्ये ९० मिली क्षमतेच्या प्रती बॉक्समध्ये १०० प्रमाणे एकूण ७ हजार ५०० सिलबंद निपा आढळून आल्या. दारू वाहतुकीसाठी वापरलेली स्कुटर व दारू मिळून एकूण ६ लाख ६५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. सोमेश्वर गोहणे रा.फोकुर्डी याचेवर चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे दारूविक्रेत्याचे धाबे दणाणले आहे.

आरमोरीत दारू तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरमोरी पोलिसांनी पळसगाव-जोगीसाखरा मार्गावर सापळा रचून दारूची तस्करी करणाऱ्या दोन युवकांना दारूसह पकडून शनिवारी अटक केली. तुषार महादेव जुमनाके व विनोद भोजरा मेश्राम (२५) दोघेही रा.बरडटोली ता.अर्जुनी मोरगाव जि.गोंदिया असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सदर युवक दुचाकी वाहनाने दारूची आयात करीत होते. पोलिसांनी त्यांना पकडून त्यांच्याकडून २४ हजार रुपये किमतीच्या देशी दारूच्या ४०० निपा जप्त केल्या. दुचाकीची किंमत ३० हजार रुपये आहे. ही कारवाई आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगांबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक चेतनसिंग चव्हाण, पोलीस हवालदार गौतम चिकनकर, पोलीस नाईक लक्ष्मण नैताम, शिपाई राकेश सिंग यांनी केली.

Web Title: Six lakh domestic liquor seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.