तळोधीत दारूचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:00 IST2020-04-28T05:00:00+5:302020-04-28T05:00:56+5:30
तळोधी येथे लॉकडाऊनच्या काळात १४ एप्रिलपर्यंत गावातील स्वयंसेवकांनी नाकेबंदी केली. त्याकाळात पोलीस पाटील अनिल कोठारे, तंमुस अध्यक्ष परशुराम कुनघाडकर, समितीचे मिलींद मेडपीलवार आदींनी भेट देऊन दारूविक्रेत्यांना वारंवार तंबी दिली. परंतु या तंबीचा दारुविक्रेत्यांवर काहीच परिणाम झाला नाही. याबाबत चामोर्शीचे पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांनी एवढ्या मोठ्या तालुक्यात एकाच गावाकडे लक्ष देऊ शकत नाही, असे लोकमत प्रतिनिधीशी भ्रमणध्वनीवर सांगितले होते.

तळोधीत दारूचा सुळसुळाट
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोधी (मो.) : लॉकडाऊनमुळे सर्व कामधंदे, व्यवसाय व रोजगार ठप्प असतानाही चामोर्शी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तळोधी, हिवरगाव येथे दारूचा महापूर आहे. या भागात पोलिसांचे वाहन दररोज सायंकाळच्या सुमारास चकरा मारत असले तरी दारू विक्रेत्यांवर मात्र कारवाई होताना दिसून येत नाही.
तळोधी येथे लॉकडाऊनच्या काळात १४ एप्रिलपर्यंत गावातील स्वयंसेवकांनी नाकेबंदी केली. त्याकाळात पोलीस पाटील अनिल कोठारे, तंमुस अध्यक्ष परशुराम कुनघाडकर, समितीचे मिलींद मेडपीलवार आदींनी भेट देऊन दारूविक्रेत्यांना वारंवार तंबी दिली. परंतु या तंबीचा दारुविक्रेत्यांवर काहीच परिणाम झाला नाही. याबाबत चामोर्शीचे पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर यांनी एवढ्या मोठ्या तालुक्यात एकाच गावाकडे लक्ष देऊ शकत नाही, असे लोकमत प्रतिनिधीशी भ्रमणध्वनीवर सांगितले होते. चामोर्शी ठाण्याचे अनेक पोलीस शिपाई दारूविक्रेत्यांच्या घरी ये-जा करताना दिसतात, असा आरोपही नागरिकांचा आहे. ठाण्यातील एक पोलीस उपनिरीक्षक आपल्या ताफ्यासह गावात येत असतात. पोलिसांचा एक व्यक्ती गावात असतानाही त्यांना गावात दारुविक्री होत असल्याची माहिती का होत नाही, असा सवालही नागरिकांनी केला आहे. येथील बसथांब्याजवळ असलेल्या एका विक्रेत्याचा संपर्क तालुका व जिल्हास्तरावरील एका पोलीस अधिकाºयाशी आहे. त्यामुळे पोलीस काहीच करणार नाही, अशा आविर्भावात तो गावात वागताना दिसून येतो. काही पोलिसांचा आश्रय व पाठिंबा दारूविक्रेत्यांना निडर बनवत आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून तळोधी व हिवरगावातील अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी कली आहे.
पांढरीभटाळ व लसनपेठवरुन पुरवठा
तळोधी व हिवरगावात पांढरीभटाळ व लसनपेठ येथून ३ ते ४ पुरवठादार दारुचा पुरवठा करतात. सध्या लॉकडाऊन असतानाही या गावांमध्ये सुरळीत पुरवठा होत आहे. काही पोलीस दर महिन्याला प्रत्येक दारुविक्रेत्याकडे येऊन चिरीमिरी घेऊन जातात, असेही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा पोलीस कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई होणे आवश्यक आहे, असा सूर नागरिकांमध्ये उमटत आहे.