उसेगावच्या जंगलात एकापाठोपाठ ६ वाघांचे दर्शन

By गेापाल लाजुरकर | Published: June 14, 2023 04:00 PM2023-06-14T16:00:01+5:302023-06-14T16:01:45+5:30

सायंकाळी रस्ता ओलांडला : रात्री ठाण मांडून बसले

Sighting of 6 tigers one after the other in Usegaon forest of gadchiroli | उसेगावच्या जंगलात एकापाठोपाठ ६ वाघांचे दर्शन

उसेगावच्या जंगलात एकापाठोपाठ ६ वाघांचे दर्शन

googlenewsNext

गडचिरोली : जिल्ह्याच्या वडसा व गडचिरोली वन विभागात गेल्या पाच वर्षांपासून वाघांची दहशत आहे. अधूनमधून वाघांचे दर्शन रस्त्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना होते. सोमवारी सायंकाळी ७ वाजता देसाईगंज तालुका मुख्यालयापासून ८ किलोमीटर अंतरावरील उसेगावच्या जंगलात वाघांचे दर्शन झाले. चारचाकी वाहनाने जाणाऱ्या प्रवाशांनी जंगलातून जाणारा रस्ता ६ वाघांनी ओलांडतानाचे छायाचित्र टिपले व व्हिडीओसुद्धा तयार करून व्हायरल केला.

देसाईगंज-आरमोरी राष्ट्रीय महामार्गालगत शिवराजपूर फाटा आहे. हा मार्ग पुढे माोहटोला-किन्हाळा व कुरखेडा तालुक्यातील गावांना जोडतो. हा मार्ग जंगलातून गेला आहे. सोमवारी सायंकाळी ७ वाजता जंगलातून चारचाकी वाहनाने जाणाऱ्या प्रवाशांना उसेगावच्या जंगलात दोन प्रौढ तर चार बछडे अशा एकूण सहा वाघांचे दर्शन झाले. 

वाघांचा वावर असल्याची माहिती देसाईगंज परिसरात पसरताच अनेकांनी चारचाकी वाहनाने उसेगावचे जंगल गाठले. विशेष म्हणजे, रात्री १०:३० वाजता सर्व सहा वाघ याच परिसरात रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. परंतु, यावेळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाहने पुढे जाऊ दिली नाहीत. वाहने पुढे नेण्यास दोन्ही बाजूंनी मज्जाव केला. यापूर्वी मार्च महिन्यात देसाईगंज-आरमोरी मार्गावर ४ वाघांचे दर्शन झाले होते.

वाघ पाहण्यासाठी रात्रीची सैर

वडसा वन विभागात २१ वाघांचा वावर आहे. यापैकी जवळपास १५ वाघ हे देसाईगंज तालुक्यात आहेत. कुरूड, कोंढाळा, शिवराजपूर तसेच उसेगाव व अन्य भागातील नागरिकांना वाघांचे दर्शन नेहमीच होत असते. हीच बाब हेरून देसाईगंज शहरातील अनेक नागरिक चारचाकी वाहनाने उसेगाव-कोंढाळा परिसरात वाघ पाहण्यासाठी रात्रीची सैर करतात. परंतु, ही सैर धोक्याची होऊ शकते.

Web Title: Sighting of 6 tigers one after the other in Usegaon forest of gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.