झाडीपट्टी रंगभूमी झाली आता व्यावसायिक
By Admin | Updated: October 26, 2014 22:40 IST2014-10-26T22:40:16+5:302014-10-26T22:40:16+5:30
झाडीपट्टीच्या रंगभूमीचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे वडसा (देसाईगंज) होय. याच ठिकाणावरून नाट्य प्रयोगाची तारीख निश्चित केली जाते. नाटकाचा दिग्दर्शक म्हणजे सर्वेसर्वा. स्त्री-पुरूष कलावंतांच्या

झाडीपट्टी रंगभूमी झाली आता व्यावसायिक
वैरागड : झाडीपट्टीच्या रंगभूमीचे मध्यवर्ती ठिकाण म्हणजे वडसा (देसाईगंज) होय. याच ठिकाणावरून नाट्य प्रयोगाची तारीख निश्चित केली जाते. नाटकाचा दिग्दर्शक म्हणजे सर्वेसर्वा. स्त्री-पुरूष कलावंतांच्या तारखा घेणे, आपले कमिशन ठेवून नटनट्यांचे रेटबोर्ड तयार करण्याचे काम या नाटकाच्या दिग्दर्शकाकडे असते. सिनेमा व मालिकेतील नावाजलेले कलावंत चार-पाच मित्र मंडळी गोळा करून लोकांना आकर्षीत करणारे बॅनर, पोस्टर लाऊन आमच्याकडे उत्कृष्ट नाटकाचे प्रयोग उपलब्ध असल्याचे फलक लावून नाटकाच्या तारखा निश्चित करण्याच्या कामाला आता वेग आला आहे. सध्या कलेचे मोल पैशाने ठरत असून झाडीपट्टी रंगभूमी व्यावसायिक बनली असल्याचे दिसून येत आहे.
यापूर्वी काही वर्ष मोजक्याच नाट्यप्रयोग सादर करणारे मंडळे होती. तेव्हा या नाट्यप्रयोगातील कलाकारांचा दर्जा उत्तम होता. पूर्व विदर्भात गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात झाडीपट्टीच्या नाटकाला अधिक पसंती आहे. कार्तिक पौर्णिमा म्हणजे तुळशी विवाह आटोपल्यानंतर गावागावात मंडई भरविण्याची प्रथा आजही कायम आहे. दिवसा मंडई आणि रात्री मनोरंजनासाठी नाट्य प्रयोगाचे आयोजन करणे हे नित्याचेच झाले आहे. सध्या नाट्यप्रयोगाचा खर्च ४० ते ५० हजारापर्यंत आहे. सदर खर्च परवडण्यासारखा नाही. तिकीट आकारून जमा केलेले सर्व पैसे नाट्यमंडळाच्या घशात जातात. सध्या होत असलेल्या झाडीपट्टी रंगभूमीच्या नाट्यप्रयोगामधून फारसे समाजप्रबोधनही होत नाही. याशिवाय आता शहरातील झाडीपट्टी नाट्यमंडळांवर छत्तीसगडी धमाक्याने अवकळा आली आहे.
दंडार, तमाशा या लोककलेच्या प्रकारातून झाडीत जन्माला आली म्हणून ती झाडीपट्टीची रंगभूमी होय. पूर्वी ध्वनीक्षेपकाची सोय नसतांनासुद्धा दिवाबत्तीच्या उजेडात प्रेक्षक दंडार, तमाशा या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचे. झाडीपट्टी रंगभूमीचे दिवस आता संपण्याच्या मार्गावर आहे. गावात एकदा नाट्यप्रयोग झाला की, त्याचे स्मरण अनेक दिवस टिकून राहायचे. आता मात्र नाट्य मंडळाच्या भाऊगर्दीत व पैसा कमविण्याच्या नादात केवळ मनोरंजनावरच भर दिला जात आहे. तसेच उत्कृष्ट अभिनय करणाऱ्या नटाला कायम स्मरणात ठेवणे कठीण झाले आहे. (वार्ताहर)