झाडीपट्टी रंगभूमीचे झाले सिमोलंघन
By Admin | Updated: February 20, 2015 01:03 IST2015-02-20T01:03:52+5:302015-02-20T01:03:52+5:30
विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या चार जिल्ह्यांना झाडीचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. झाडी एक स्वतंत्र बोलीभाषा आहे. झाडीपट्टीमध्ये विविध लोकउत्सव साजरे केले जातात.

झाडीपट्टी रंगभूमीचे झाले सिमोलंघन
विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या चार जिल्ह्यांना झाडीचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. झाडी एक स्वतंत्र बोलीभाषा आहे. झाडीपट्टीमध्ये विविध लोकउत्सव साजरे केले जातात. त्या उत्सवाचाच एक भाग म्हणजे मंडई आणि शंकरपट, हे येथील लोकांचा अविभाज्य भाग आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने बैलांच्या शर्यतींवर बंदी घातली तरीसुद्धा आजही झाडीच्या क्षेत्रामध्ये मंडई मोठ्या दिमाखदार पद्धतीने साजरी केली जाते. मंडई, शंकरपट म्हटलं की, येथील लोकांना नाट्यकलेचे वेड लागते यातूनच सामुहिक भांडवल तत्वावर झाडीच्या क्षेत्रात झाडीपट्टी रंगभूमी अस्तित्वात आली. या नाटकांचा प्रवास झाडीपट्टीच्या सीमा ओलांडून छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या अमराठी भाषिक राज्यात दाखल झाला आहे.
झाडीच्या क्षेत्रामध्ये मंडई किंवा शंकरपट आयोजनामागे एक विशिष्ट हेतू होता पूर्वीच्या काळी दळणवळणाची साधने कमी असल्याने आप्त्येष्टांना एकमेकांच्या घरी भेटी देण्यासाठी हा एक महत्वाचा योग मानल्या जाई. त्यातल्या त्यात मंडई, शंकरपट निमित्याने अनेक उपवर मुलामुलींचे लग्न जुळवून आणण्याचे कार्य या उत्सवातून घडून यायचे. बदलत्या काळानुसार दळणवळणांच्या साधनात बदल झाला तरी परंपरेचा एक भाग म्हणून मंडई, शंकरपट निमित्य नाट्यप्रयोगांचे आयोजन हमखास होते व ते करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथे या नाट्यनिर्मितीचे फार मोठे केंद्र उभे झाले आहे.
टीव्ही, रेडीओ, मोबाईल, गुगल, फेसबुक, ट्विटर, हाईक इ. लाखो मनोरंजनाची सोशिअल नेट्वर्किंग साईट वा अप्लिकेशन उपलब्ध असतांनाही शंकरपट, मंडई अथवा सण, उत्सव किंवा विशेष दिनी खेडोपाडी नाटकांचे दिवाळी ते होळी या कालावधीत वडसा येथील ३५ नाट्य रंगभूम्या तब्बल १४०० नाटकांचे प्रयोग सादर करतात हे सुद्धा एक नवलच आहे. सध्याच्या संगणकीय विज्ञान युगात मनोरंजनाची हजारो तंत्रसाधने हाताच्या बोटावर आली तरीसुद्धा झाडीपट्टीच्या रंगभूमीवरील नाटकांची क्रेझ कायम असून आजही येथील दर्दी प्रेक्षक तोबा गर्दी करून त्याच चवीने हा झाडीचा मेवा अवीट गोडीने चाखत आहे.
यात काळानुरूप जनतेच्या आवडीत बदल झाल्याने लेखकांनाही नाटकांचे विषय बदलविणे क्रमप्राप्त ठरल्याने धार्मिक, ऐतिहासिक, आध्यात्मिक नाटकांकडून कौटुंबिक, समाजप्रबोधनात्मक नाटक पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल वाढला. त्यामुळे झालीवूड च्या नाटकांची प्रसिद्धी बॉलीवूडची राजधानी मुंबईपर्यंत पोहचली.
मुंबईच्या यशवंत रंगमंदिरात 'सून सांभाळा पाटलीण बाई' हे नाटक सादर झाले. पुढे या नाटकावर आधारित याच नावाचे मराठी चित्रपटही निर्माण झाले जे ब्रह्मपुरीसह राज्यातील २२ चित्रपटगृहात प्रदर्शित झाले होते. परंतु आजघडीला झाडीपट्टी रंगभूमीवरील नाटकांनी राज्याची सीमा पार केली असून वडसातील हिरालाल पेंटर यांच्या 'झाडीबोली' रंगभूमी निर्मित नाटकांचे प्रयोग छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश या राज्यात वास्तव्यास असलेल्या मराठी भाषिक पट्टयात आयोजित केले जातात. यावरून झाडीच्या नाटकांची प्रसिद्धी तसेच एक वेगळं स्थान आपणास दृष्टीस पडते.
आता झाडीपट्टीतील नाटक फक्त महाराष्ट्रातच राहिलेली नाही तर तिने सिमोलंघन केले असून हा खरं म्हणजे आपल्या ओजस्वी लेखणीतून नाट्यकृती साकारणारे प्रतिभासंपन्न लेखक, या नाटक कलेवर जीवापाड प्रेम करणारे रसिक आणि त्या कलेत जीव ओतून काम करणारे कलावंत या सर्वांचा गौरव आहे. प्रत्येक मनुष्यात एक कला असते मात्र ती नुसती असून चालत नाही तर ती कला ओळखून तिचा विकास करणे आणि वर्षानुवर्ष ती तेवत ठेवणे ही सुद्धा एक कलाच आहे. यात झाडीपट्टी रंगभूमी चहूबाजूंनी सरस होऊन आपली परंपरा कायम ठेवण्यात यशस्वी ठरल्याचे या सीमापार नाटकांच्या प्रवासाने परत दाखवून दिले आहे. ज्या दिवशी येथील नाटक देशाच्या सीमापार करून परदेशात एन्ट्री मारेल तेव्हा ही 'लोकल' कला खऱ्या अर्थाने 'ग्लोबल' होईल.