जिल्हाभरात जळाऊ लाकडांचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:35 IST2021-05-14T04:35:51+5:302021-05-14T04:35:51+5:30
एटापल्ली : जिल्हाभरातील वन विभागांच्या डेपोमध्ये जळाऊ लाकडांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अंत्यविधीसाठीही लाकडे मिळणे कठीण झाले आहे. पाणी ...

जिल्हाभरात जळाऊ लाकडांचा तुटवडा
एटापल्ली : जिल्हाभरातील वन विभागांच्या डेपोमध्ये जळाऊ लाकडांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अंत्यविधीसाठीही लाकडे मिळणे कठीण झाले आहे.
पाणी टाकीची सुरक्षा वाऱ्यावर
गडचिरोली : पाण्याचा पुरवठा करण्यासाठी गावांमध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे, परंतु या टाकीच्या सुरक्षेसाठी प्रशासन गंभीर नसल्याचे दिसते.
नियमांचे उल्लंघन
गडचिरोली : शहरासह अनेक तालुका मुख्यालयाच्या उपाहार गृह व हॉटेलमध्ये उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री होत आहे. यामुळे परिसरात विविध आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. मात्र याकडे संबंधित विभाग कोणतीही कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे.
अपघाताची शक्यता
चामोर्शी : अनेक पुलांवर अद्यापही कठडे लावण्यात आले नाहीत. त्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता आहे. थंडीच्या दिवसात सकाळच्यासुमारास धुक्यामुळे समोरचा रस्ता दिसत नाही. कठडे नसल्याने अपघात होऊन मोठी हानी होण्याची शक्यता आहे.
सुविधांचा अभाव
गडचिरोली : गडचिरोली नगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या गोकुलनगरलगत माता मंदिराच्या पलीकडे अनेक घरांची वस्ती गेल्या काही वर्षांपासून वसली आहे. अनेक कुटुंबे या भागात वास्तव्यास आहेत. मात्र, या भागात पक्के रस्ते, नाली, पथदिवे नाहीत.
मद्यपींची वर्दळ वाढली
गडचिराेली : आरमाेरी मार्गावरील पाेर्ला गावात अनेक ठिकाणी दारूची विक्री केली जात आहे. सायंकाळच्यासुमारास येथे मद्यपींची वर्दळ दिसून येते. कारवाईकडे पाेलिसांचे दुर्लक्ष आहे. परिसरातील अनेक मद्यपी पाेर्लात जाऊन शाैक भागवित आहेत.
कळमटाेला मार्गावर खड्डे
गडचिराेली : तालुक्यातील दिभना ते कळमटाेला या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. या मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांना त्रास हाेत आहे. त्यामुळे मार्गाची लवकर डागडुजी करून नूतनीकरण करावे, अशी मागणी हाेत आहे.
तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न थंडबस्त्यात
गडचिरोली : गोकुलनगरलगतच्या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी प्रशासनाच्यावतीने हाती घेण्यात आले होते. मात्र, सौंदर्यीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाले नाही. त्यामुळे या तलावात आता अतिक्रमण वाढले असून, अस्वच्छता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न थंडबस्त्यात आहे. सिंचन विभागाच्या मालकीचा हा तलाव असला, तरी अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यासाठी या विभागाकडून चालढकल केली जात आहे. नगरपालिका प्रशासन मूग गिळून गप्प बसली आहे. पदाधिकारी सुद्धा या तलावाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत.
शहरातील अनेक वॉर्डांत सट्टापट्टी जोमात
देसाईगंज : शहरात सट्टापट्टी जोमात सुरू आहे. अनेक युवक सट्टापट्टीच्या नादात लागले आहेत. शहरात शेकडो एजंट सट्टापट्टीची वसुली करीत आहेत. मात्र, याकडे देसाईगंज पोलिसांचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते. सकाळपासूनच सट्टापट्टी लावण्यास सुरुवात होते. आरमाेरी शहरही अवैध धंद्याचे माहेरघर बनले आहे. तालुक्याच्या अनेक माेठ्या गावात दिवसाढवळ्या सट्टापट्टी व जुगार खेळला जात आहे. अवैध धंदे सुरू असल्याने शहरी व ग्रामीण भागातील सामाजिक स्वास्थ्य धाेक्यात आले आहे. प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधा
आरमोरी : शहरात सार्वजनिक मूत्रिघर नसल्याने, जनतेने स्वत:हून काही ठिकाणी अघोषित मूत्रिघर तयार केले आहेत. त्यामुळे जवळपासचे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधणे आवश्यक आहे. अनेक दिवसांपासून ही मागणी केली जात आहे, परंतु या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने आवश्यक त्या ठिकाणी स्वच्छतागृहे निर्माण केली नाहीत.
तलाठी-ग्रामसेवकांच्या अनेक जागा रिक्त
एटापल्ली : अहेरी उपविभागाच्या एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा व अहेरी या पाचही तालुक्यांत महसूल विभागांतर्गत येणाऱ्या तलाठी व ग्रामसेवकांची अनेक पदे रिक्त आहेत. परिणामी, शेतकरी व नागरिकांची कामे खोळंबत असल्याचे दिसून येत आहे.
कुंपणाअभावी पिकांचे जनावरांकडून नुकसान
गडचिरोली : प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने तार कुंपणाचा पुरवठा केला जातो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या तारांचा पुरवठा करण्याची मागणी आहे. शेत पिकांच्या संरक्षणासाठी सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना काटेरी तार पुरविणे आवश्यक आहे. जनावरांच्या त्रासामुळे अनेकांनी शेती सोडली आहे.
एकेरी वाहतुकीबाबत हालचाली नाही
गडचिरोली : गडचिरोली शहरातील मुख्य बाजारपेठ त्रिमूर्ती चौकातून आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या मार्गावर आहे. सणासुदीच्या कालावधीत व आठवडी बाजाराच्यादिवशी रविवारला या मार्गावर वाहनधारकांची प्रचंड गर्दी असते. अनेकदा वाहतुकीची कोंडी होते.
ठेंगण्या व अरुंद पुलाचा प्रश्न कायमच
गडचिरोली : ब्रिटिश काळात बांधलेला एकही पूल गडचिरोली जिल्ह्यात नसला, तरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर तयार करण्यात आलेला चंद्रपूर-आलापल्ली मार्गावरील आष्टीचा पूल ठेंगणा व अरुंद असल्यामुळे या पुलावरून आजवर अनेकांचा वाहन कोसळून बळी गेला आहे.
अंकिसा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील मुख्य मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गावरून आसरअल्लीदरम्यानच्या गावातील नागरिक ये-जा करीत असल्याने या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे या मार्गाची बांधकाम विभागाने दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
साखरा बसथांब्यावर गतिरोधक उभारा
गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावर भरधाव वाहतूक होत असल्याने, साखरा येथील बसथांब्यावर गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गतिरोधकाअभावी या ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत.
पोटेगाव रस्त्यावर घाणीचे साम्राज्य
गडचिरोली : शहरातील पोटेगाव मार्ग निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जातो. या मार्गाने अनेक नागरिक फेरफटका मारण्यासाठी पहाटे व सायंकाळी जात असतात, परंतु पोटेगाव रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी घाणीचे साम्राज्य आहे.
ग्रामीण भागातील वीज खांब धोकादायक
आलापल्ली : अहेरी तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांत अनेक ठिकाणी वाकलेले खांब असून, ताराही लोंबकळत आहेत. यामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. त्यामुळे वाकलेले वीज खांब व लोंबकळलेल्या तारा सुरळीत कराव्यात, अशी मागणी होत आहे.
पशुपालन योजनांची जनजागृती करा
भामरागड : पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे. त्यामुळे या योजनांची जनजागृती करावी.
बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित
कुरखेडा : बांधकाम कामगारांची नोंदणी ग्रामपंचायस्तरावर करण्याचे निर्देश शासनाने दिले असले, तरी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. ग्रा. पं. प्रशासनाच्या जनजागृतीअभावी ग्रामीण व दुर्गम भागातील बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित असल्याचे दिसून येते. परिणामी त्यांना शासनाच्या योजनाच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.
रस्त्यावर कचरा; कारवाई करा
देसाईगंज : घंटागाडी वॉर्डात फिरत असतानाही या घंटागाडीत कचरा टाकत नाही. उलट काही लोक तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कचरा टाकतात. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आहे.
लाहेरीत नवीन आराेग्य केंद्र बांधा
भामरागड : लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पुरेशा इमारतीअभावी एकाच खोलीतून सुरू आहे. या आरोग्य केंद्रात परिसरातील अनेक रुग्ण औषधोपचारासाठी दररोज येतात. या आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे काम सुरू करावे.
ग्रामीण भागात गॅस एजन्सीची गरज
धानोरा : वन विभागामार्फत संयुक्त वन व्यवस्थापनचे सदस्य व जंगल परिसरातील नागरिकांना अनुदानावर मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. पेंढरी परिसरातील ९० टक्के कुटुंबांकडे गॅस आहेत.