तंबाखूजन्य पदार्थ विक्री न करण्याची दुकानदारांनी दिली हमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:34 IST2021-05-15T04:34:58+5:302021-05-15T04:34:58+5:30
तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे कोरोना महामारीचा प्रादुर्भाव ...

तंबाखूजन्य पदार्थ विक्री न करण्याची दुकानदारांनी दिली हमी
तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे कोरोना महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी घातली आहे. तरी किराणा दुकानांच्या माध्यमातून दुकानदार तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करीत असल्याचे दिसून येते. कायद्याचे उल्लंघन थांबविण्यासाठी मुक्तिपथ अभियानाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील दुकानदारांपर्यंत पोहाेचण्याचा मुक्तिपथचा प्रयत्न आहे. त्यानुसार गडचिरोली शहरातील सर्वोदय वाॅर्ड, गांधी वाॅर्ड, हनुमान वाॅर्ड, नेहरू वाॅर्ड, चनकाईनगर, गोकुळनगर, रामनगर या भागातील किराणा दुकानांना चमूने भेट देत व्यावसायिकांकडून हमीपत्र भरून घेतले. व्यावसायिकांनी हमीपत्रावर स्वाक्षरी करीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.
‘तंबाखूमुळे कोरोना पसरतो व कॅन्सर होतो. या दुकानात तंबाखूजन्य पदार्थ मिळणार नाही' अशा आशयाचे हमीपत्र व्यावसायिकांच्या स्वाक्षरीनिशी दुकानासमोर लावण्यात आले. तसेच तंबाखूयुक्त पदार्थांच्या विक्रीवर शासकीय बंदी आहे. खर्रा, गुडाखू, नस विकणे शासकीय आदेशानुसार गुन्हा आहे, असे तंबाखूचे दुष्परिणाम सांगत जनजागृती करण्यात आली.