शिवणी गाव लखपती

By Admin | Updated: October 28, 2016 01:02 IST2016-10-28T01:02:33+5:302016-10-28T01:02:33+5:30

पेसाअंतर्गत शिवणी गावाला २०१५-१६ या वर्षात तेंदूपत्ता खरेदी-विक्रीचे अधिकार प्राप्त झाले.

Shimni village Lakhpati | शिवणी गाव लखपती

शिवणी गाव लखपती

तेंदूपत्ता संकलनातून : १० लाख ५० हजारांचा नफा
कुरखेडा : पेसाअंतर्गत शिवणी गावाला २०१५-१६ या वर्षात तेंदूपत्ता खरेदी-विक्रीचे अधिकार प्राप्त झाले. तेंदूपत्त्यातून एकूण १० लाख ५० हजार रूपयांचा नफा कमविला. या एकूण नफ्यातून ७० टक्के रक्कम बोनस स्वरूपात नागरिकांना वितरित करण्यात आली. यासाठी महाजनटोला येथे कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवणी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष साबू पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच मधुकर गावडे, भाजपा तालुकाध्यक्ष राम लांजेवार, विजयकुमार भैसारे, ग्रामसचिव के. बी. कावळे, ग्रामपंचायत सदस्य दौलत कुमोटी, ग्रामकोष समिती अध्यक्ष नामदेव धुर्वे, कासिम खान उपस्थित होते.
शासनाने पेसाअंतर्गत समाविष्ट ग्रामसभांना इच्छुक असल्यास तेंदूपत्ता संकलनाचा तसेच इतर वनोपज गोळा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. २०१५-१६ या वर्षामध्ये शिवणी ग्रामपंचायतीने स्वत:च तेंदू संकलन केले व तेंदूपत्त्याची विक्री केली. यातून ग्रामपंचायतीला १० लाख ५० हजार रूपयांचा नफा प्राप्त झाला. तेंदूपत्ता संकलनाची अतिशय उत्कृष्ट पद्धतीने नियोजन केल्याने या ग्रामपंचायतीला सर्वाधिक लाभ मिळाला आहे. एकूण नफ्याच्या सुमारे ७० टक्के रक्कम बोनस स्वरूपात गावकऱ्यांना बोनसच्या वितरित करण्यात आले. तर उर्वरित ३० टक्के रक्कम ग्रामविकासाकरिता राखीव ठेवण्यात आली आहे.
यावर्षी नागरिकांना चांगला आर्थिक लाभ मिळाल्यामुळे पुढील वर्षी सुद्धा ग्रामसभेच्या माध्यमातूनच तेंदूपत्ता संकलन करण्याचा निर्णय घेतला. तेंदूपत्ता संकलन करणे धोकादायक काम आहे. जंगलातील श्वापद हल्ला करीत असल्याने तेंदूपत्ता संकलन करणारे मजूर जखमी होतात. वेळप्रसंगी जीवही गमवावा लागतो. त्यामुळे तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरांचा विमा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवाळीपूर्वी बोनसची रक्कम मजुरांच्या हातात मिळाल्याने मजूर आनंदी आहेत. (तालुका प्रतिनिधी)

शिवणी गाववासीयांचे उत्कृष्ट नियोजन
तेंदूपत्ता संकलन करून त्याची विक्री करण्याचे अतिशय उत्कृष्टपद्धतीने नियोजन शिवणी गाववासीयांनी केले. त्यामुळे या गावाला सर्वाधिक नफा प्राप्त झाला. नियोजन नसल्यास तेंदूपत्त्यातून तोटा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संकलन केलेल्या तेंदूपत्त्याचे शास्त्रीय पद्धतीने साठवणूक केल्याने तेंदूपत्ता खराबसुद्धा झाला नाही.

Web Title: Shimni village Lakhpati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.