मुख्यमंत्र्यांना म्हणाल्या, ‘अच्छा हुआ आप आये...’; पतीच्या आत्मसमर्पणाने ‘तारक्का’ झाल्या भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 08:43 IST2025-10-16T08:41:51+5:302025-10-16T08:43:41+5:30
उभी हयात चळवळीत घालवलेल्या विमला सिडाम उर्फ तारक्कासह भूपतीने १५ ऑक्टोबरला नव्या आयुष्याच्या दिशेने पाऊल ठेवले. मुख्यमंत्र्यांसमोर जाताच तारक्काने ‘अच्छा हुआ आप आये...’ असे म्हणत आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी दोघांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्र्यांना म्हणाल्या, ‘अच्छा हुआ आप आये...’; पतीच्या आत्मसमर्पणाने ‘तारक्का’ झाल्या भावुक
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य व जहाल नेता मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनूच्या आत्मसमर्पणाचा सर्वाधिक आनंद पत्नी विमला सिडाम उर्फ तारक्काला झाला. १ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तारक्काने आत्मसमर्पण केले होते. पाठोपाठ पतीनेही शस्त्र सोडल्याने त्या सुखावल्या. भूपतीच्या आत्मसमर्पणावेळी मुख्यमंत्र्यांनी खास ताराक्का यांना मंचावर बोलावले. तेव्हा मुख्यमंत्र्यांसाठी आणलेल्या पुष्पगुच्छाने मुख्यमंत्र्यांनीच या जोडीचा सत्कार केला.
उभी हयात चळवळीत घालवलेल्या विमला सिडाम उर्फ तारक्कासह भूपतीने १५ ऑक्टोबरला नव्या आयुष्याच्या दिशेने पाऊल ठेवले. मुख्यमंत्र्यांसमोर जाताच तारक्काने ‘अच्छा हुआ आप आये...’ असे म्हणत आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी दोघांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
डोळे अश्रूंनी भरले
कार्यक्रमाच्या ठिकाणी तारक्काचे डोळे अश्रूंनी भरले होते, तर भूपतीच्या चेहऱ्यावरही हास्य ओसंडून वाहात होते.
मंचावर आगमन होताच भूपतीने हसत हसत फडणवीस यांच्या हाती एके-४७ बंदूक सोपविली. मुख्यमंत्र्यांनी त्याच्या हातातील शस्त्र घेतले व त्याला संविधान भेट दिले.
नवजीवनाची संधी फक्त संविधानातून : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री म्हणाले, या आत्मसमर्पणाने गडचिरोलीतून एक सकारात्मक संदेश पसरतोय, हिंसाचाराचा मार्ग सोडून, प्रत्येकाला नव्या जीवनाची संधी मिळते, ही संधी बंदुकीच्या जोरावर नाही तर संविधानातूनच मिळते.
भूपतीने मुख्यमंत्र्यांसमोरच आत्मसमर्पण करेन, अशी अट सुरक्षा यंत्रणेला ठेवली होती, अशी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना याची पुष्टी दिली. भूपती शस्त्र सोडत असेल तर माझी जंगलात जाण्याचीही तयारी होती, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.