‘ती’ झाली एसटी बसमध्ये प्रसूत; प्रवासी महिलांनी केली मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 14:21 IST2019-12-10T14:20:53+5:302019-12-10T14:21:33+5:30
धावत्या रेल्वेत वा बसमध्ये प्रसुती कळा सुरू होऊन महिला प्रसूत झाल्याच्या अनेक घटना आपण वाचतो, ऐकतो. तशाच प्रकारची एक घटना मंगळवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यात घडली.

‘ती’ झाली एसटी बसमध्ये प्रसूत; प्रवासी महिलांनी केली मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: धावत्या रेल्वेत वा बसमध्ये प्रसुती कळा सुरू होऊन महिला प्रसूत झाल्याच्या अनेक घटना आपण वाचतो, ऐकतो. तशाच प्रकारची एक घटना मंगळवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यात घडली. वडसामार्गे चंद्रपूरकडे जात असलेल्या साकोली आगाराच्या बसमध्ये प्रवास करत अशलेल्या एका गरोदर महिलेला अचानक प्रसुतीकळा सुरू झाल्या. ती एकटीच प्रवास करत असल्याने घाबरून गेली. मात्र बसमध्ये असलेल्या अन्य महिला प्रवाशांनी तिला धीर देत काही अंतर पार केले. या रस्त्यावरच असलेल्या कासवी फाटा येथे बस थांबवून सर्व पुरुष प्रवाशांना खाली उतरविले. नंतर या महिला प्रवाशांनी आपल्या धैर्याचा व प्रसंगावधानतेचा परिचय देत या गरोदर महिलेची प्रसूती बसमध्येच केली.
प्रसूतीनंतर बाळ व बाळंतीण सुखरूप असल्याचे सर्वांना कळल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. या दोघांच्या प्रकृतीला काही अपाय होऊ नये म्हणून त्यांना आरमोरीच्या उप जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
या सर्व घटनाक्रमात बसचे चालक विलास गेडाम व वाहक योगेश भारवे यांनी मोलाची भूमिका बजावली.