शंकरपट बंदीने झाडीपट्टीला लागले मंडईचे वेध
By Admin | Updated: April 1, 2016 01:53 IST2016-04-01T01:53:42+5:302016-04-01T01:53:42+5:30
सर्वाेच्च न्यायालयाने शंकरपटावर बंदी घातल्यानंतर गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील झाडीपट्टीतील नागरिकांना मंडईचे वेध लागले आहेत.

शंकरपट बंदीने झाडीपट्टीला लागले मंडईचे वेध
गर्दी वाढली : गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात विशेष महत्त्व
अतुल बुराडे विसोरा
सर्वाेच्च न्यायालयाने शंकरपटावर बंदी घातल्यानंतर गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील झाडीपट्टीतील नागरिकांना मंडईचे वेध लागले आहेत. शंकरपटाऐवजी आता नागरिक मंडईमध्ये गर्दी करू लागले असल्याने मंडईची क्रेझ वाढली आहे.
गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया व भंडारा या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. त्यामुळे या चार जिल्ह्यांना महाराष्ट्राचे तांदळाचे कोठार म्हणूनही ओळखल्या जाते. खरीप हंगामातील धान पीक नोव्हेंबर महिन्यात निघते. डिसेंबर महिन्यात कापणी व बांधणीचे काम पूर्ण होते. सतत चार महिने धानाच्या शेतीत राबराब राबणाऱ्या शेतकऱ्याला थोडीफार उसंत मिळते. त्याचबरोबर धान विकून पैसेही जमा होतात. त्यामुळे जानेवारी महिन्यापासून शेतकऱ्याच्या घरी आनंद व पैसा खेळायला लागतो.
या दिवसांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये मंडईचे आयोजन करण्यात येते. मंडई हा एकच शब्द असला तरी मंडईच्या दिवशी त्या गावामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मंडईच्या दिवशी दिवसभर गावाच्या जवळपास छोटेखानी जत्रेचे आयोजन करण्यात येते. या जत्रेला गावातील नागरिकांचे नातेवाईक व सभोवतालच्या गावांमधील नागरिक उपस्थित राहतात. रात्रीच्या सुमारास त्या गावामध्ये दंडार, नाटक, तमाशा, छत्तीसगडी नृत्य आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे दिवस व रात्रभर विविध कार्यक्रमांचे रेलचेल राहते.
सर्वाेच्च न्यायालयाने शंकरपटांवर बंदी घालण्याच्या पूर्वी जत्रेबरोबरच शंकरपटाचे आयोजनही केले जात होते. मात्र शंकरपटावर बंदी घातली असल्याने आता मंडईमध्ये नागरिकांची गर्दी वाढायला लागली आहे. मंडईचे आयोजन महाराष्ट्रातील या चार जिल्ह्यांबरोबरच सीमेवरच्या छत्तीसगड राज्यांतील जिल्ह्यांमध्येही आयोजित केली जाते. एकच दिवसाची मंडई भरत असली तरी त्या गावासाठी तो सर्वाधिक आनंदाचा दिवस राहते. त्यामुळे त्या मंडईच्या दिवसाचे वेध गावकऱ्यांना दोन महिन्यांपासूनच लागलेले राहते. नियोजन करून मंडईचा आनंद कसा लुटायचा हे ठरविले जाते. फेब्रुवारी महिन्यापासून मंडई भरण्यास सुरूवात झाली आहे. सध्या मंडईची रेलचेल ग्रामीण भागामध्ये सुरू असल्याचे दिसून येत आहे.
मंडईतून लग्नही जोडतात
मंडईच्या निमित्ताने सर्व नातेवाईकांना बोलविले जाते. त्यामुळे मंडईसाठी आलेले ज्येष्ठ नागरिक उपवर- वधू यांच्याविषयी बोलणी करतात. ही प्राथमिक बोलणी राहते. त्यानंतर लग्न जोडल्या जाते. त्याचबरोबर मंडईसाठी तरूण मुले- मुली एकमेकांना पसंत करतात. त्यामुळे मंडईच्या माध्यमातून लग्न जुडण्यासही मदत होत असल्याने मंडईचे महत्त्व आणखीच वाढले आहे.