कलादालनातील अव्यवस्था शिगेला
By Admin | Updated: August 30, 2014 23:44 IST2014-08-30T23:44:13+5:302014-08-30T23:44:13+5:30
मानव विकास मिशनच्या निधीतून २००९ साली पोटेगाव मार्गावर बांधण्यात आलेल्या गोंडवन कलादालनाला मागील पाच वर्षांपासून रंगरंगोटी करण्यात आली नाही. त्याचबरोबर संग्रहालयात ठेवण्यात

कलादालनातील अव्यवस्था शिगेला
गडचिरोली : मानव विकास मिशनच्या निधीतून २००९ साली पोटेगाव मार्गावर बांधण्यात आलेल्या गोंडवन कलादालनाला मागील पाच वर्षांपासून रंगरंगोटी करण्यात आली नाही. त्याचबरोबर संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या वस्तूंकडेही दुर्लक्ष झाले असल्याने या वस्तूंवर धुळ साचली आहे. मात्र याकडे जिल्हाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे.
जिल्ह्यातील आदिवासींच्या संस्कृतीची माहिती शहरातील नागरिकांना कळावी, यासाठी पोटेगाव मार्गावर तहसील कार्यालयाच्या बाजुला सुमारे ४० लाख रूपये खर्चुन गोंडवन कलादालन या इमारतीचे बांधकाम करण्यात आले. वरचा मजल्यावर सभागृह बांधण्यात आले आहे. सदर सभागृह भाड्याने दिला जातो तर तळमजल्यावर आदिवासींची संस्कृती दर्शविणाऱ्या वस्तूंचे संग्रहालय तयार करण्यात आले आहे. संग्रहालयातील बहुतांश वस्तूंना काचेच्या सहाय्याने बंद करण्यात आले आहे. सदर संग्रहालय पाहण्यासाठी ५ रूपये तिकीट आकारण्यात येते. मात्र या ठिकाणची चांगली साफसफाई केली जात नसल्याने काच व इतर वस्तूंवर धुळ जमा झाली आहे. मागील पाच वर्षांपासून येथील वस्तू व भिंतींची रंगरंगोटी करण्यात आली नाही. एवढेच नाही तर येथील साफसफाई करण्यासाठी १० रूपयाची झाडूसुद्धा घेऊन दिले जात नाही. परिणामी संग्रहालयातील वस्तू आकर्षक दिसत नसल्याने संग्रहालयाला भेट देणाऱ्यांची संख्या रोडावत चालली आहे. एवढेच नाही तर इमारतीवर लिहिण्यात आलेले गोंडवन कलादालन व गोंडवन संग्रहालय हे नाव सुद्धा मिटण्याच्या मार्गावर आहे.
कलादालनाच्या बाजुला किरायाणे देण्यासाठी सुमारे ११ व्यापारी गाळे बांधण्यात आली आहेत. मात्र यापैकी एकही गाळा किरायाणे देण्यात आलेला नाही. गाळ्यांच्या समोर प्लॅस्टिक व कचऱ्याचा खच जमा झाला आहे. गाळ्यांच्या समोर शेड असल्याने पावसाळ्यात मोकाट जनावरांचे रात्री थांबण्याचे ठिकाण बनले आहे. जनावरांच्या मलमुत्राच्या दुर्गंधीचाही त्रास या ठिकाणी येणाऱ्यांना सहन करावा लागत आहे. कलादालनाच्या चारही बाजुने संरक्षक भिंत टाकण्यात आली असली तरी दरवाजा बनविण्यात आला नाही. त्यामुळे रात्रीच्या सुमारास या ठिकाणी येणाऱ्या जनावरांना अडविणे शक्य होत नाही. या इमारतीचे रात्रंदिवस देखभाल ठेवण्यासाठी तिघांची नेमणूक करण्यात आली आहे. या तिघांनाही प्रत्येकी केवळ २ हजार ५०० रूपये एवढेच महिनाभराचे मानधन दिले जाते. किमान वेतन कायद्याच्या बाता करणारे प्रशासन स्वत:च या कायद्याचे उल्लंघन करीत आहे. (नगर प्रतिनिधी)