सात लाखांची दारू पकडली
By Admin | Updated: December 17, 2015 01:35 IST2015-12-17T01:35:15+5:302015-12-17T01:35:15+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गठित करण्यात आलेल्या विशेष जिल्हा दारूबंदी ...

सात लाखांची दारू पकडली
तुमरगुंडा, देसाईगंज, जोगीसाखरात धाड : एक चारचाकी, दुचाकी वाहन जप्त; दोन आरोपी फरार
गडचिरोली : जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गठित करण्यात आलेल्या विशेष जिल्हा दारूबंदी पथकाने आलापल्ली-भामरागड मार्गावरील तुमरगुंडा, देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथे धाड टाकून एक चारचाकी, एक दुचाकी वाहनासह सात आरोपींकडून ७ लाख १४ हजार ९२० रूपयांची दारू तीन दिवसांत पकडली.
पेरमिली येथील महानंद नारायण वैरागी व संजय मिस्त्री हे दोघेजण एमएच-३३-जी-६५८५ या दुचाकीने दारूची आयात करून सदर दारू आलापल्ली येथील चिल्लर दारूविक्रेता गजानन सांबय्या कोरेंटलावार (३७) यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याची गुप्त माहिती जिल्हा दारूबंदी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे दारूबंदी पथकाने आलापल्ली-भामरागड मार्गावरील तुमरंगुडा गावाच्या समोर असलेल्या पुलाच्या परिसरात गस्त घालून दुचाकीला अडवून दारूविक्रेत्याकडून १९ हजार २०० रूपयांच्या ९६ निपा जप्त केल्या. या प्रकरणातील दारूविक्रेते आरोपी महानंद नारायण वैरागी व गजानन समय्या कोरेंटलावार यांना अटक केली. तसेच संजय मिस्त्री रा. पेरमिली हा फरार होण्यास यशस्वी झाला.
दारूबंदी पथकाच्या पोलिसांनी देसाईगंजच्या तुकूम वॉर्डात मंगळवारी धाड टाकून येथील दारूविक्रेती महिला शारदाबाई देवानंद सहारे (५०) हिच्याकडून देशी दारूच्या २४८ निपा, विदेशी दारूच्या चार निपा जप्त केल्या. या दारूची एकूण किंमत १० हजार ७२० रूपये आहे.
त्यानंतर दारूबंदी पथकाला बुधवारी आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा शेतशिवारातून चारचाकी वाहनाने अवैध दारूची आयात होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे दारूबंदी पथकाच्या पोलिसांनी जोगीसाखराच्या शेतशिवाराज सापळा रचला. येथे एमएच-०२-पीए-३१७१ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाला अडवून झडती घेतली. या वाहनातून २ लाख ६० हजार रूपये किंमतीची देशी दारू जप्त केली. तसेच ४ लाख रूपये किंमतीचे चारचाकी वाहनही जप्त केले. या प्रकरणातील दारूविक्रेता आरोपी मुकेश लोडके बडोदे (२६), सोनू रामदास भोयर (२०) दोघेही रा. इंदिरानगर गडचिरोली यांना अटक केली. या प्रकरणातील दारूविक्रेता आरोपी गुड्डू ऊर्फ मनोज दहिकर रा. धानोरा हा फरार झाला आहे. पथकाच्या पोलिसांनी सर्वच सातही आरोपींवर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)