वीज ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 00:38 IST2019-08-02T00:37:51+5:302019-08-02T00:38:10+5:30
महावितरणच्या गडचिरोली उपविभागातर्फे गडचिरोली येथे ३० जुलै रोजी ग्राहक सुसंवाद व तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विजेशी संदर्भातील १३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

वीज ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महावितरणच्या गडचिरोली उपविभागातर्फे गडचिरोली येथे ३० जुलै रोजी ग्राहक सुसंवाद व तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विजेशी संदर्भातील १३ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर महावितरणमार्फत सुसंवाद व तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन केले जात आहे. गडचिरोली येथे ३० जुलै रोजी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष योगीता पिपरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य राम मेश्राम, नगरसेवक प्रमोद पिपरे, अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, कार्यकारी अभियंता विजय मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
प्राप्त झालेल्या तक्रारींमध्ये बहुतांश तक्रारी या वीज बिलासंदर्भात होत्या. या तक्रारींचे निवारण करण्यात आले. ग्राहकांशी सुसंवाद साधताना अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांनी मागील दोन वर्षात महावितरणमध्ये झालेल्या तसेच होत असलेल्या बदलांची व सुधारणांची माहिती दिली. वीज बिल भरण्यासाठी महावितरणतर्फे वॉलेट तयार केले जात आहे. या वॉलेटचा उपयोग करून वीज बिल भरल्यास शारीरिक व मानसिक त्रास वाचण्यास मदत होईल. बँकेत जाण्याची ग्राहकांना गरज पडणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा वापर करावा, असे आवाहन केले.
नगराध्यक्षा योगीता पिपरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. अशा प्रकारचे मेळावे काही महिन्याच्या अंतराने आयोजित करावे, असे आवाहन केले. मेळाव्याला अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस.डी.सूर्यवंशी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस.व्ही.वाशिमकर, कनिष्ठ अभियंता व्ही.पी.जोशी आदी उपस्थित होते.