लखमापूर बोरी येथे कोविड लसीकरण केंद्र उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:39 IST2021-04-28T04:39:54+5:302021-04-28T04:39:54+5:30
४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी नुकतेच जे लसीकरण झाले होते त्यांचे लसीकरण केंद्र ही तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र ...

लखमापूर बोरी येथे कोविड लसीकरण केंद्र उभारा
४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी नुकतेच जे लसीकरण झाले होते त्यांचे लसीकरण केंद्र ही तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या ठिकाणीच ठेवण्यात आलेले होती. त्यामुळे ही लस घेण्यासाठी बोरीवासीयांना एक तर भेंडाळा किंवा चामोर्शी या दोन्ही ठिकाणी १० कि.मी. अंतरावरील केंद्रावर जाऊन लस घेण्याशिवाय पर्याय नव्हता. ही लस घेण्यासाठी अनेक वृद्धांना पायपीट व वेळ, पैसा खर्च करून केंद्रावर जावे लागले होते. या त्रासामुळेच गावातील ४५ वर्षांवरील अनेक व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहिले होते. आता १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांनाच मोफत लस दिली जाणार असल्याने गावातील लसीसाठी पात्र असणाऱ्यांची संख्या साहजिकच अधिक असणार आहे. मागच्या लसीकरणावेळी आलेला अनुभव पाहता या लसीकरणासाठीही अनेक व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहण्याची भीती आहे. यावर उपाय म्हणून गावातच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवनिर्मित इमारतीत ज्याची ९० टक्के बांधणी पूर्ण झाली आहे किंवा जिल्हा परिषद शाळा अथवा भगवंतराव हायस्कूलच्या इमारतीत लसीकरण केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी केली आहे. यासाठी वीज, पंखे, कुलर्स, पिण्याच्या पाण्याची सोय, लसीकरणासाठी येणाऱ्या व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन राहण्यायोग्य प्रशस्त जागा, लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सोय उपलब्ध करून देण्याची व्यवस्था ग्रा. पं. तर्फे करून देण्याचे आश्वासन ग्रा. पं. च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलेले आहे. जेणेकरून बोरीवासीयांचा भेंडाळा किंवा चामोर्शी हे १० किमी अंतर पार करून जाण्याचा नाहक त्रास वाचेल व पर्यायाने वेळ, अंतर, पैसा आदींची बचत होईल,असे लखमापूरबोरी वासीयांनी म्हटले आहे.