राष्ट्रसंताचे जिल्ह्याशी स्रेहबंध

By Admin | Updated: April 30, 2016 01:29 IST2016-04-30T01:29:27+5:302016-04-30T01:29:27+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा गडचिरोली जिल्ह्याशी निकटचा संबंध होता.

Serenity of Nation | राष्ट्रसंताचे जिल्ह्याशी स्रेहबंध

राष्ट्रसंताचे जिल्ह्याशी स्रेहबंध

आठवणीतील राष्ट्रसंत : तुकडोजी महाराज जयंती (ग्रामजयंती)
गडचिरोली : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा गडचिरोली जिल्ह्याशी निकटचा संबंध होता. येथील श्री गुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे यांच्या बालपणीच्या असंख्य आठवणींमध्ये राष्ट्रसंतांच्या अलौकिक दर्शनाचे प्रतिबिंब आहे. मूळचे आरमोरी तालुक्यातील डॉ. कुंभारे यांच्या परिवाराशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जिव्हाळ्याचा संबंध होता महाराज आपल्या दौऱ्यादरम्यान चंद्रपूरहून चिमूर , नागभीडमार्गे आरमोरीला आले की, त्यांचा मुक्काम कुंभारे परिवाराकडेच ठरलेला असायचा. त्यामुळे डॉ. कुंभारे अगदी बालपणापासूनच राष्ट्रसंतांच्या सानिध्यात आले, नव्हे त्यांना राष्ट्रसंतांच्या मांडीवर खेळण्याचे भाग्य लाभले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. डॉ. कुंभारे यांचे वडील बाळकृष्ण कुंभारे आपल्या पाच भावांसह संयुक्त कुटुंबातच राहायचे. महाराज घरी येताच ‘संत येती घरा तोची दिवाळी- दसरा’ म्हणत सारेच त्यांच्या सेवेत रममाण व्हायचे. आरमोरीतील पोलीस स्टेशनच्या बाजूला बाजार परिसरात राष्ट्रसंतांचे खंजेरी भजन व्हायचे. रात्री ९ वाजता सुरू होणारा खंजेरीचा आवाज रात्री १२ वाजतापर्यंत अखंड निनादत राहायचा. हजारोंच्या संख्येने नागरिक त्यांच्या भजनात तल्लीन व्हायचे. याशिवाय गडचिरोली, डोंगरगाव, शिवणी, पोर्ला येथेही राष्ट्रसंत भजनासाठी जायचे. राष्ट्रसंतांचे निर्वाण ११ आॅक्टोबर १९६८ ला झाले. १९६७ मध्ये राष्ट्रसंत आरमोरीला आले होते. त्यावेळेस डॉ. कुंभारे नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी.बी.एस.च्या द्वितीय वर्षात शिकत होते. नित्याप्रमाणेच राष्ट्रसंतांचा मुक्काम कुंभारे कुटुंबाकडे होता. रात्री राष्ट्रसतांचा भजन कार्यक्रम झाला. ‘मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव’, ‘’माझं गावच मंदिर शोभलं’, ‘फिर मन से गाऊगा तेरा भजन, उँचा उठा दे मेरा प्यारा वतन’ अशी अनेक भजने त्यांनी सादर केली. कार्यक्रमाची सांगता करताना राष्ट्रसंतांनी ‘आम्ही जातो आमच्या गावा, अखेरचा रामराम घ्यावा’ म्हणत हा कदाचित इथला माझा शेवटचा कार्यक्रम असेल, असही सांगितलं होतं. आपल्या मृत्यूची चाहूल या महान संताला आधीच लागली होती. त्या शेवटच्या भेटीबद्दल सांगताना डॉ. कुंभारे सांगतात, ‘त्या रात्री महाराज आणि मी एकाच खोलीत झोपलो होतो. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. म्हणाले, बाळा खूप रात्र झालीय. निवांत झोप. पण, लक्षात ठेव तुला खूप मोठं व्हायचं आहे. देशाकडे , समाजाकडे लक्ष ठेवं. लोकांना फक्त सुया टोचत बसून नको. समाजाची आंतरिक वेदना जाणून समाजाच्या समस्येवर उपचार कर.’ महाराजांचे ते आशीर्वादाचे शब्द प्रमाण माणून आजही वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून कुंभारे गुरूदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून कार्य करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

राष्ट्रसंतांचे जिल्ह्यातील शिक्षणकार्य
ग्रामविकासाचा मार्ग सोपा करून सांगणाऱ्या ग्रामगीतेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘याचसाठी शिक्षण घेणे, की जीवन जगता यावे सुंदरपणे, दुबळेपण घेतले आंदणे, शिक्षण त्यासी म्हणो नये’, त्यामुळेच राष्ट्रसंतांना शिक्षण प्रसाराची तळमळ होती. ज्या काळात गडचिरोली शहराच्या सिमेवर पाऊल ठेवण्यास भलेभले घाबरायचे त्या काळात १९५८ मध्ये अहेरी तालुक्यातील कमलापूर येथील घनदाट अरण्यात राष्ट्रसंतांनी आदिवासी बालकांसाठी पहिली आश्रमशाळा सुरू केली. ही कदाचित भारतातील पहिली आश्रमशाळा असावी. आता शासकीय योजनेतून असंख्य आश्रमशाळा स्थापन झाल्या आहेत.पण, आदिवासी समाजबांधवांच्या निबीड अरण्यातील झोपडीत ज्ञानगंगा आणणाऱ्या आश्रमशाळेचे पहिले प्रवर्तक म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचाच उल्लेख करावा लागेल. त्या काळात गडचिरोलीत मातीचे रस्ते होते. आष्टी पलिकडे अहेरी जाताना नदी, नाल्यांमुळे सहा, सहा महिने मार्ग बंद असायचे. अशा काळात महाराजांनी स्वत: जाऊन ही आश्रमशाळा निर्माण करीत आदिवासी बालकांच्या शिक्षणाची सोय केली. त्यांचे परमशिष्य तुकारामदादा गीताचार्य यांनीही राष्ट्रसंतांच्या हस्ते प्रारंभ झालेली ही आश्रमशाळा चालविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. शिक्षण प्रक्रीयेत उच्च शिक्षणासाठी शहरे, महानगरे गाठावी लागतात. अठराविश्वे दारिद्र्यात जन्मलेली गरिबांची मुले आर्थिक विपन्नावस्थेमुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. म्हणून राष्ट्रसंत म्हणतात, ‘त्यापेक्षा उच्च ज्ञानाची विद्यालये, गावीच आणावी निश्चये, जी ग्रामजीवन सजवितील चातुर्ये, शिकवोनी जना’, आपला हाच संदेश सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी ग्रामीणच नव्हे,तर अतिदुर्गम अशा कमलापूरसारख्या परिसरात शिक्षण केंद्रे सुरू केली. ही शिक्षणाची केंद्रे केवळ परीक्षार्थी विद्यार्थी व पोटार्थी अधिकारी, कारकून घडविणारी नसावी, अशी भावना व्यक्त करताना राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतच शिक्षणाची अशी सहजसुंदर व्याख्या केली आहे, ‘सहकार्याची प्रबल भावना, हेची शिक्षणाचे मुख्य सूत्र जाणा, सहकार्या वाचोनि शिक्षणा, महत्त्व नाही’

Web Title: Serenity of Nation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.