उपेक्षित झाडीपट्टी रंगभूमीचा 'पद्मश्री'मुळे दिल्लीत डंका; गडचिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 10:55 AM2023-04-07T10:55:13+5:302023-04-07T10:56:56+5:30

नाट्यकलावंत परशुराम खुणेंच्या पाच दशकांच्या सेवेचा सन्मान, ५००० नाटकांतून ८०० भूमिका साकारल्या

Senior theatre artist of Gadchiroli dr. Parshuram Khune honored with Padma Shri award | उपेक्षित झाडीपट्टी रंगभूमीचा 'पद्मश्री'मुळे दिल्लीत डंका; गडचिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा

उपेक्षित झाडीपट्टी रंगभूमीचा 'पद्मश्री'मुळे दिल्लीत डंका; गडचिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा

googlenewsNext

गडचिरोली : जिल्ह्यातील अस्सल ग्रामीण बाज असलेल्या झाडीपट्टी रंगभूमीवर पाच दशके विनोदी भूमिका साकारून रसिकांना खिळवत ठेवणारे ज्येष्ठ नाट्यकलावंत डॉ. परशुराम खुणे यांना ५ एप्रिल रोजी पद्मश्री हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामुळे जिल्ह्याच्या शीरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. उपेक्षित असलेल्या झाडीपट्टीचा यानिमित्ताने देशाच्या राजधानीत डंका पिटला आहे.

डॉ. परशुराम खुणे यांना लोककला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आदी उपस्थित होते. खुणे यांनी नक्षल प्रभावित भागात लोककलेच्या माध्यमातून पुनर्वास आणि सामाजिक कुप्रथांवर बोट ठेवून लोकजागृती केली. विदर्भातील काही निवडक ग्रामीण कलांची आपली वेगळी ओळख आहे. त्यापैकीच झाडीपट्टी एक.

गडचिरोलीसह चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांतही झाडीपट्टी रंगभूमीला आजही मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आहेत. पाच दशकांपासून डॉ. परशुराम खुणे हे नाट्यक्षेत्रात कार्यरत आहेत. बदलत्या प्रवाहातही आपल्या अस्सल मराठमोळ्या व जिवंत कलाकृतींतून त्यांनी झाडीपट्टी रंगभूमीला वैभव प्राप्त करून दिले. सलग पाच दशके रसिकांच्या मनावर राज्य करणारे डॉ. परशुराम खुणे दिल्लीत सन्मानित झाल्याने झाडीपट्टी रंगभूमीच्या वैभवात भर पडली आहे.

गाजवला आयुष्याचाही फड

डॉ. परशुराम खुणे यांनी केवळ नाट्यकलावंत म्हणून भूमिका साकारल्या नाहीत, तर ते भूमिका जगले. रंगमंचाबरोबरच प्रत्यक्ष आयुष्यातही त्यांनी कलाकारी जपली. होमिओपॅथीतून वैद्यकीय पदवी संपादन करून ते डॉक्टर झाले. त्यानंतर समाजसेवाही व राजकारणाचा फडही गाजवला. त्यांनी तब्बल १५ वर्षे गावातल्या सरपंचपदाची धुरा सांभाळली. ५ वर्षे उपसरपंचपद भूषविले. यासोबतच जिल्ह्यातील दुर्गम भागातील तरुणांना व्यसनमुक्त करण्यासह अंधश्रध्देच्या जोखडातून मुक्त करण्याचे कामही केले. नक्षलवादी प्रभावातल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीदेखील त्यांनी योगदान दिले.

दिवसा भात शेती, रात्री गाजवायचे झाडीपट्टी रंगभूमी

डॉ. परशुराम खुणे हे गुरनुली (ता. कुरखेडा) येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील कोमाजी पाटील हे नाट्य दिग्दर्शनाचे काम करत. त्यांच्याकडूनच परशुराम खुणे यांनी नाट्यकलेचे बाळकडू घेतले. शालेय शिक्षणासाठी बालपणी ते चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे मामाकडे होते. तेथे त्यांच्यातील कलावंतावर पैलू पडले. झाडीपट्टी नाट्यातील विनोदी कला त्यांनी केल्या. दिवसा भात शेती व रात्री रंगभूमीवर ते कला सादर करत. वडील व मामांच्या तालमीत ते घडले.

दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या झाडीपट्टी नाट्यपरंपरेमुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. तब्बल पाच दशके रसिकांनी माझ्यासारख्या साध्या नाट्यकलावंतावर प्रेम करावे, दाद द्यावी ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. पद्मश्री पुरस्काराचे खरे श्रेय मला दाद देऊन प्रोत्साहन वाढविणाऱ्या हजारो नाट्यरसिकांना जाते.

- डॉ. परशुराम खुणे, पद्मश्री पुरस्कार प्राप्त नाट्यकलावंत.

Web Title: Senior theatre artist of Gadchiroli dr. Parshuram Khune honored with Padma Shri award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.