बियाणांच्या बिलावरचे लॉट व बॅच नंबर गायब
By Admin | Updated: June 21, 2016 01:02 IST2016-06-21T01:02:45+5:302016-06-21T01:02:45+5:30
खरीप हंगामासाठी बियाणे खरेदीची लगबग सध्या सुरू झाली आहे. कृषी सेवा केंद्रांमध्ये शेतकरी ग्राहकांची मोठी गर्दी

बियाणांच्या बिलावरचे लॉट व बॅच नंबर गायब
एक्सपायरी डेटचाही पत्ता नाही : बिलावरील तपशिलाबाबत शेतकरी अनभिज्ञ
गडचिरोली : खरीप हंगामासाठी बियाणे खरेदीची लगबग सध्या सुरू झाली आहे. कृषी सेवा केंद्रांमध्ये शेतकरी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. बियाणे खरेदी करताना विविध बाबींची काळजी घ्या, असे आवाहन कृषी विभागाने केले असले तरी अनेक कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांना बियाणे खरेदीचे बिल देताना त्यावर बॅच लॉट क्रमांक, वैधता मुदत तारीख आदी बाबींचा उल्लेखच करण्यात येत नसल्याचे सोमवारी लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आले आहे. खरेदी केलेल्या बियाणे थैलीचे बॅच बरोबर सांभाळून ठेवा एवढेच दुकानदार ग्राहक शेतकऱ्यांना सांगत आहे. मात्र बिलांवर बऱ्याच दुकानदारांकडून बॅच नंबर व वैधता दिनांकाचा उल्लेख लिहिण्याचे टाळल्या जात असल्याचे दिसून आले आहे.
चामोर्शी येथे लोकमत प्रतिनिधीने सकाळी कृषी केंद्रातून बियाणे खरेदी करताना कृष्णनगर टोला येथील जगदिश आराधन मंडल या शेतकऱ्याला गाठले. या शेतकऱ्याने चामोर्शीच्या गौरी कृषी केंद्रातून बियाणे खरेदी केले. ६३० रूपये दरानुसार त्याने बियाण्याच्या तीन थैल्या १८९० रूपयाला खरेदी केल्याचे दिसून आले. या कृषी सेवा केंद्राने बिलावर असलेल्या प्रत्येक कॉलममध्ये शेतकऱ्याला माहिती भरून दिल्याचे दिसून आले. येथील बिलावर बॅच लॉट क्रमांक, वैधता मुदत तारीख आदी बाबींचा स्पष्ट उल्लेख असल्याचे दिसून आले.
देसाईगंज येथे दोन वेगवेगळ्या कृषी केंद्राजवळ लोकमत प्रतिनिधीने शेतकऱ्याच्या खरेदी केलेल्या बियाण्यांच्या पावत्यांची पाहणी केली. अनेक शेतकरी बिलावरील मजकुराबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. कोकडी येथील दशरथ मारोती टिकले या शेतकऱ्याने राहूल कृषी केंद्र येथून धान बियाणे खरेदी केले. या खरेदीच्या बिलावर शेतकऱ्याचे नावही व्यवस्थित लिहिण्यात आले नाही. शिवाय बॅच नंबर व मुदतबाह्य तारीख याचा उल्लेखही बिलावर नाही. केवळ वजन, नग व दर याचाच उल्लेख करून त्याला हे बिल देण्यात आले असल्याचे दिसून आले. तर ठाणेगावच्या बाळकृष्ण शेंडे या शेतकऱ्याने जयकिसन माणिकलाल फाफट या कृषी विक्रेत्याकडून बियाणे खरेदी केले. या बिलावर बॅच नंबर व मुदतबाह्य तारीख यामध्ये एकच बाब नमुद करण्यात आली आहे. बाकी सर्व तपशील लिहून देण्यात आला आहे.
आरमोरी येथे नरचुली येथील धनंजय मडावी या शेतकऱ्याने किसान कृषी केंद्रातून बियाणे खरेदी केले. येथील बिलावर बॅच नंबरचा उल्लेख करण्यात आला. मात्र अवधीचा उल्लेख करण्यात आला नाही. बाकी सर्व तपशील लिहून देण्यात आला.
गडचिरोली शहरात कौशल अॅग्रो कृषी केंद्रातून बोदली गावच्या वसंत निकोडे यांनी बियाणे खरेदी केले. त्यांना देण्यात आलेल्या बिलावर लॉट नंबर व बॅच नंबरचा उल्लेख करण्यात आलेला नाही, असे दिसून आले. बाकी सर्व बाबी या बिलावर नमूद करण्यात आल्या होत्या. तर बाम्हणी गावातील मारोती सानबावणे या शेतकऱ्याने गणेश कृषी केंद्र तलाव रोड गडचिरोली येथून धानबिज खरेदी केले. या बिलावर बॅच नंबर लिहिण्यात आला. मात्र मुदतबाह्य दिनांकाचा उल्लेख गणेश कृषी केंद्राच्या बिलांवर करण्यात आलेला नाही, असे दिसून आले. अनेक शेतकरी मात्र हे बिलावरील मजकुरांबाबत जागरूक दिसले नाही.
धान बिजाई खरेदी केलेल्या दुकानातून आपल्याला सर्व गोष्टीचा उल्लेख असलेले बिल मिळाले आहे. धानाची पेरणी कशी करायची याबाबत मला माहिती सांगण्यात आली. पक्के बिल त्यांनी आपल्याला दिले आहे. या बिलावर लॉट नंबर, बॅच नंबर, बिजाई तयार केल्याची तारीख, क्विंटलचा भाव सुध्दा घालण्यात आला आहे.
- जगदीश आराधन मंडल, रा. कृष्णनगर टोला, ता. चामोर्शी
आम्ही शेतकरी अडाणी व अशिक्षित असल्याने कृषी धान्य विक्रेते जे चांगले धान आहे म्हणून देतो ते आम्ही लागवड करतो. दिलेले बिल असली की नकली याबाबत आपल्याला काहीच कल्पना नाही. पिशवीवर लावलेले कागद जपवून ठेवण्यास सांगण्यात आले.
- दशरथ मारोती टिकले, शेतकरी, कोकडी ता. देसाईगंज जि. गडचिरोली
वरील बिलांवर लॉट नंबर व बॅच नंबरचा उल्लेख करण्यात आलेला नाही. हे बिल शेतकऱ्यांजवळून घेऊन लोकमतने तपासले. त्यावेळी ही बाब उघडकीस आली. अनेक ठिकाणी हा कॉलम कोराच ठेवण्यात आला आहे. तसेच बियाण्याच्या एक्सपायरी डेटचा उल्लेख केवळ पहिल्या बिलावर आहे. उर्वरित दोन बिलांवर दिसून येत नाही. मधल्या बिलावर शेतकऱ्याचे आडनावही व्यवस्थित लिहिले नाही.