मंगळवारी सर्चमध्ये दारूमुक्ती परिषद
By Admin | Updated: January 25, 2015 23:13 IST2015-01-25T23:13:53+5:302015-01-25T23:13:53+5:30
स्वातंत्र्य सेनानी व देशातील ज्येष्ठ गांधीवादी स्व. ठाकूरदास बंग यांच्या द्वितीय स्मृतीदिनी २७ जानेवारी रोजी मंगळवारला धानोरा मार्गावरील सर्च शोधग्राम येथे सकाळी ११ वाजता

मंगळवारी सर्चमध्ये दारूमुक्ती परिषद
गडचिरोली : स्वातंत्र्य सेनानी व देशातील ज्येष्ठ गांधीवादी स्व. ठाकूरदास बंग यांच्या द्वितीय स्मृतीदिनी २७ जानेवारी रोजी मंगळवारला धानोरा मार्गावरील सर्च शोधग्राम येथे सकाळी ११ वाजता ‘मद्यराष्ट्राकडून महाराष्ट्राकडे’ या विषयावर दारूमुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांनी दिली आहे.
मंगळवारला सकाळी ११ वाजता प्रार्थना व स्मरण कार्यक्रम होणार असून त्याच दिवशी दुपारी महाराष्ट्रातील दारूच्या प्रश्नावर परिषद आयोजित केली आहे. वर्धा व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीची अंमलबजावणी अपूर्ण आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील स्त्रियांचे आंदोलन, शासकीय देवतळे समितीने केलेली दारूबंदीची शिफारस आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात लवकरच दारूबंदी लागू करण्याची केलेली घोषणा या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केव्हा लागू होणार, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या तीन संलग्न जिल्ह्यांच्या दारूमुक्त झोनमध्ये प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, महाराष्ट्रात अन्यत्र दारूनियंत्रण कसे करावे? या विषयांवर महाराष्ट्रातील सामाजिक संघटना व कार्यकर्ते तसेच तिनही जिल्ह्यातील राजकीय नेते, अधिकारी यांनी सहविचार करून यासंबंधी घोषणापत्र जाहीर करावे या हेतूने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. बंग यांनी दिली आहे.
मद्यराष्ट्राकडून महाराष्ट्राकडे या विषयावरील दारूमुक्ती परिषदेत दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणी व त्यासाठी करावयाचे प्रयत्न यावर सखोल चर्चा होणार आहे. परिषदेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)