विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने फुलून गेल्या शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 05:00 IST2021-10-05T05:00:00+5:302021-10-05T05:00:29+5:30
दीड वर्षांपासून शाळा बंद हाेत्या. मात्र, विद्यार्थी शाळेत येताना काेणतीही जुनी गाेष्ट विसरले नाही. गणवेश घालून वेळेवर शाळेत पाेहाेचले. विशेष म्हणजे यावेळी शिस्तीचे पूर्ण पालन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत माेठ्या उत्साहात करण्यात आले. काही ठिकाणी पुस्तक, काही ठिकाणी गणवेश तर काही शाळांमध्ये शालेय साहित्य देऊन स्वागत करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने फुलून गेल्या शाळा
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड वर्षांपासून बंद असलेल्या जिल्ह्यातील शाळा साेमवारी उघडल्या. ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते आठवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतच्या मिळून एकूण १२०० शाळांमध्ये पहिल्या दिवशी प्रत्यक्ष वर्ग भरविण्यात आले. प्राथमिक शिक्षणाधिकारी हेमलता परसा, माध्यमिक शिक्षणाधिकारी आर. पी. निकम यांच्यासह विविध अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या शाळांना भेटी देऊन पहिल्या दिवशीच्या स्थितीची पाहणी केली. अनेक शाळांमध्ये शिक्षक व पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
दीड वर्षांपासून शाळा बंद हाेत्या. मात्र, विद्यार्थी शाळेत येताना काेणतीही जुनी गाेष्ट विसरले नाही. गणवेश घालून वेळेवर शाळेत पाेहाेचले. विशेष म्हणजे यावेळी शिस्तीचे पूर्ण पालन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत माेठ्या उत्साहात करण्यात आले. काही ठिकाणी पुस्तक, काही ठिकाणी गणवेश तर काही शाळांमध्ये शालेय साहित्य देऊन स्वागत करण्यात आले. शाळांमध्ये सुरक्षित अंतर बाळगुण सॅनिटायझर व मास्कचा वापर करण्यात आला. शरीराचे तापमान व ऑक्सिजनचे प्रमाण माेजून विद्यार्थ्यांना शाळेत घेण्यात आले. माध्यमिक शिक्षणाधिकारी आर. पी. निकम व त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काही शाळांना भेटी देेऊन तेथील पहिल्या दिवशीची परिस्थिती जाणून घेतली.
शिक्षणाधिकारी हेमलता परसा यांनी काटली येथील जि. प. प्राथमिक शाळेला भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. गटशिक्षणाधिकारी यू. एन. राऊत यांनी नगरी येथील जि. प. शाळेला भेट देऊन तेथील साेयी-सुविधांची पाहणी केली.
इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र घुगरे व तेथील शिक्षक उपस्थित हाेते.