शालेय पाठ्यपुस्तके तालुकास्थळी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 22:29 IST2019-05-21T22:29:05+5:302019-05-21T22:29:29+5:30
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शाळा सुरू होण्यास पुन्हा महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना तालुकास्तरावर पुस्तके पोहोचविण्यात आली आहेत. तालुकास्तरावरून पुस्तके घेऊन जाण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहणार आहे.

शालेय पाठ्यपुस्तके तालुकास्थळी दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शाळा सुरू होण्यास पुन्हा महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना तालुकास्तरावर पुस्तके पोहोचविण्यात आली आहेत. तालुकास्तरावरून पुस्तके घेऊन जाण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहणार आहे.
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुदानित, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे मोफत वितरण केले जाते. शासनाकडून पाठ्यपुस्तके मिळत असल्याने पालकवर्ग पाठ्यपुस्तके खरेदी करीत नाही. पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थी शाळेमध्ये यावा, यासाठी शाळेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे पहिल्या वर्गातील विद्यार्थी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत पोहोचतो. मात्र त्याला पाठ्यपुस्तके मिळाली नाही तर त्याचा हिरमोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच तालुकास्तरावरील गट शिक्षणाधिकारी कार्यालयापर्यंत पुस्तके पोहोचविण्यात आली आहेत.
जिल्हाभरात एकूण १ लाख १६ हजार ९१० लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना ६ लाख ३४ हजार ४८६ पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. जिल्हाभरात पहिल्या वर्गाचे एकूण १४ हजार ३१३, दुसऱ्या वर्गाचे १४ हजार ३७३, तिसºया वर्गाचे १४ हजार ७०३, चौथ्या वर्गाचे १४ हजार ८८९, पाचव्या वर्गाचे १४ हजार ३६६, सहाव्या वर्गाचे १४ हजार ५०८, सातव्या वर्गाचे १५ हजार २०८, आठव्या वर्गाचे १५ हजार २०८ लाभार्थी विद्यार्थी आहेत.
विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांवर अन्याय
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांवर असा भेदभाव केला जातो. पाठ्यपुस्तके केवळ अनुदानित शाळांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांना दिली जातात. मात्र विनाअनुदानित शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जात नाही. त्यामुळे विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये दुजाभाव केल्याची भावना निर्माण होते. शासन विनाअनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतन देत नाही. दुसरीकडे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेशापासून वंचित ठेवून त्यांची कुचंबना करते.
गणवेशाचा निधी आलाच नाही
गट शिक्षणाधिकारी कार्यालयापर्यंत पाठ्यपुस्तके पोहोचली असली तरी गणवेशाचा निधी मात्र उपलब्ध झाला नाही. गणवेश खरेदी करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, हे सुध्दा अजूनपर्यंत निश्चित झाले नाही. मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना गणवेशाचे पैसे किंवा गणवेश उपलब्ध होण्यासाठी अर्धे सत्र संपत असल्याचा अनुभव येत आहे. अजुनपर्यंत निधी न आल्याने याही वर्षी गणवेश मिळण्यास उशीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.