महिलांच्या खात्यात १६ कोटींची बचत
By Admin | Updated: January 30, 2016 01:55 IST2016-01-30T01:55:38+5:302016-01-30T01:55:38+5:30
दुर्गम व ग्रामीण भागातील महिलांना बचतीची सवय लावण्याबरोबरच त्यांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने जिल्हा मध्यवर्ती

महिलांच्या खात्यात १६ कोटींची बचत
दिगांबर जवादे गडचिरोली
दुर्गम व ग्रामीण भागातील महिलांना बचतीची सवय लावण्याबरोबरच त्यांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सप्टेंबर २०१४ मध्ये महिला समृध्दी बचत ठेव योजना सुरू केली असून अवघ्या दीड वर्षात सुमारे ५४ हजार ६४८ महिलांचे बँक खाते उघडण्यात आले आहेत. या खात्यांमध्ये महिलांनी १६ कोटी २० लाख रूपयांची बचत केली आहे.
दूरच्या गावात असलेली बँक, नागरिकांमध्ये बँक व्यवहारांबाबत असलेले अज्ञान यामुळे गडचिरोली जिल्ह्यात बँक खात्यांची संख्या अत्यंत कमी होती. वेळेवर एखाद्या शासकीय योजनेसाठी बँक खात्याची गरज पडल्यास फार मोठी अडचण निर्माण होत होती. विशेष करून महिलांचे बँक खाते अतिशय कमी प्रमाणात काढण्यात आले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महिला समृध्दी बचत ठेव योजना सुरू केली. या योजनेंतर्गत महिलांचे बँक खाते काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली. विशेष करून दुर्गम व ग्रामीण भागातील महिलांचे खाते काढण्यास विशेष प्राधान्य देण्यात आले. योजना सुरू झाल्यापासून अवघ्या दीड वर्षाच्या कालावधीत सुमारे ५४ हजार ६४८ महिलांचे बँक खाते उघडण्यात आले आहेत. या खात्यांमध्ये महिलांनी १६ कोटी २० लाख रूपयांची बचत केली आहे. शेतमजुरी व इतर कामांचे पैसे गोळा झाल्यानंतर महिला वर्ग बँक खात्यामध्ये रक्कम जमा करतात. यामुळे महिलांना बचतीची सवय लागण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर एखाद्या वेळेस पैशाचे काम पडल्यास बँक खात्यातून रक्कम काढली जात आहे. त्यामुळे वेळेवरच्या गरजेसाठी उधारवाडी करण्याची गरज पडत नाही.
२५५ महिला बनल्या स्वावलंबी
या योजनेच्या माध्यमातून बँक खाते काढलेल्या महिलेला कोणतेही तारण न घेता बचतीच्या दुप्पट अल्प मुदतीचे कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. या कर्जावर केवळ १२ टक्के व्याज आकारले जाते. त्यामुळे काही महिला बचत गटाकडून जास्त व्याजाचे कर्ज घेण्यापेक्षा बँकेकडून कर्ज घेण्यास पसंती दर्शवित आहेत. दीड वर्षात सुमारे २५५ महिलांनी कर्ज घेऊन स्वत:चा व्यवसाय थाटला आहे. व्यवसायाबरोबरच घरगुती कामासाठीसुध्दा कर्जाचे वितरण करण्यात येत आहे. या योजनेमुळे अनेक महिला स्वावलंबी झाल्या असून त्यांना बचतीची सवय लागली आहे.
कर्मचाऱ्यांनी घेतली मेहनत
महिलांचे बँक खाते काढण्यासाठी दुर्गम व ग्रामीण भागाला प्राधान्य देण्यात आले होते. महिलांना बँक खात्याचे महत्त्व पटवून देऊन बँक खाते काढण्याची जबाबदारी प्रत्येक शाखेच्या कर्मचाऱ्यावर सोपविण्यात आली होती. त्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला उद्दीष्टही देण्यात आले होते. कार्यालयीन वेळ संपल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांनी महिलांना प्रोत्साहित केल्याने अवघ्या दीड वर्षांच्या कालावधीत महिलांचे ५४ हजार ६४८ बँक खाते काढण्यात आले आहेत.
बँक व्यवहारांविषयी महिलांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने बँकेने महिला समृध्दी बचत ठेव योजना सुरू केली आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. बँक खाते काढल्यामुळे महिलांना बचत करण्यासही प्रोत्साहन मिळाले आहे. भविष्यात प्रत्येक महिलेचे बँक खाते असावे. यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रयत्नरत आहे.
- सतीश आयलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गडचिरोली