आज शहीदांना मानवंदना
By Admin | Updated: May 11, 2014 23:35 IST2014-05-11T23:35:24+5:302014-05-11T23:35:24+5:30
चामोर्शी तालुक्यातील मुरमुरी गावाजवळ नक्षलवाद्यांनी रविवारी सकाळी १० वाजता केलेल्या भुसुरूंग स्फोटात ७ पोलीस जवान शहीद झाले.

आज शहीदांना मानवंदना
शहीदांचे परिवार गडचिरोलीत दाखल : दुपारी आटोपले शवविच्छेदन
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मुरमुरी गावाजवळ नक्षलवाद्यांनी रविवारी सकाळी १० वाजता केलेल्या भुसुरूंग स्फोटात ७ पोलीस जवान शहीद झाले. या पोलीस जवानांच्या पार्थीवावर गडचिरोली येथे जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळावरून सकाळी ११.४५ वाजता सातही शहीद जवानांचे मृतदेह रूग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर ते शवविच्छेदन कक्षात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर शवविच्छेदन दुपारपर्यंत चालले. सर्व जवानांच्या पार्थीवावर दुपारीच शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या शवागारात पोलिसांच्या देखरेखीत ठेवण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारूखी यांनी दिली आहे. या भुसुरूंग स्फोटात पोलीस शिपाई सुनिल तुकडू मडावी रा. दुर्गापूर (जि. चंद्रपूर), रोहन हनुमंत डंबारे रा. चामोर्शी (जि. गडचिरोली), सुभाष राजेश कुमरे रा. जारावंडी ता. एटापल्ली, दुर्योधन मारोती नाकतोडे रा. कुरूड ता. देसाईगंज, तिरूपत्ती गंगय्या अल्लम रा. चिट्टूर (अंकिसा) ता. सिरोंचा, पोलीस नायक दीपक रतन विघावे रा. श्रीरामपूर (जि. अहमदनगर), वाहन चालक लक्ष्मण पुंडलिक मुंडे रा. अंतरवेली ता. गंगाखेड (जि. परभणी) हे घटनास्थळीच शहीद झाले. तर या घटनेत पंकज शंकर सिडाम रा. जारावंडी ता. एटापल्ली, हेमंत मोहन बन्सोड रा. पोटगाव (विहिरगाव) ता. देसाईगंज जि. गडचिरोली हे जखमी झाले आहेत. शहीद जवानांच्या पार्थीवाला १२ मे रोजी पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर मानवंदना देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान या घटनेत शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना त्यांच्या गावावरून गडचिरोली पोलीस मुख्यालयात आणण्यात आले आहे. सकाळपासूनच जिल्हा सामान्य रूग्णालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या जवानांसोबत अभियानावर असलेले इतर पोलीस जवानही सकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात गर्दी करून होते. त्यांचे अश्रू अनावर झाले होते. (जिल्हा प्रतिनिधी)