सूरजागड लोहखनिज प्रकल्पाला चालना द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 06:00 IST2019-12-18T06:00:00+5:302019-12-18T06:00:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज उत्खनन प्रकल्प हा जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा आहे. या प्रकल्पामुळे गडचिरोली ...

Run the Surajgad Iron Mineral Project | सूरजागड लोहखनिज प्रकल्पाला चालना द्या

सूरजागड लोहखनिज प्रकल्पाला चालना द्या

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश : नागपुरात घेतला गडचिरोलीतील समस्या व कामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज उत्खनन प्रकल्प हा जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारा आहे. या प्रकल्पामुळे गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वे सुविधा, अन्य दळणवळण, वीज पुरवठा यासारख्या विकासात्मक कामांना चालना मिळून नक्षलवाद कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे या प्रकल्पास चालना द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी मंगळवारी नागपूर येथे घेतलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या आढावा बैठकीत दिले. यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मांडलेल्या मुद्यांवरही कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या.
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विदर्भातील जिल्हानिहाय बैठका घेऊन मुख्यमंत्री आढावा घेत आहेत. त्याच अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्याचा आढावा मंगळवारी घेण्यात आला. या बैठकीस राज्य विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, गृहमंत्री एकनाथ शिंदे, गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अशोक नेते, आमदार धर्मरावबाबा आत्राम, देवराव होळी, कृष्णा गजबे, रामदास आंबटकर तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रशासनाच्या महत्त्वाच्या विभागांचे प्रधान सचिव, उपसचिव यांचीही उपस्थिती होती.
या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्ह्यातील विविध समस्या जाणून घेतल्या. जिल्ह्यातील पदभरती, दूरसंचार समस्या, शेतीविषयक समस्या, धान खरेदी याबाबतचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. ते म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्याही समस्या असल्यास हक्काने माझ्याकडे या. धान खरेदी प्रक्रिया सुरू होण्याआधीच भविष्यात येणाऱ्या संभाव्य अडचणी दूर करण्याचे नियोजन करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
या आढाव्याने जिल्ह्यातील रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मेडीगड्डाच्या परिणामांची समितीमार्फत पाहणी
लगतच्या तेलंगना राज्यातील कालेश्वरम येथे होत असलेल्या मेडीगट्टा बॅरेजच्या कामामुळे गडचिरोली जिल्ह्यातील काही क्षेत्र बुडीत झाल्याने स्थानिक आदिवासींचे नुकसान झाले आहे. मेडीगट्टा सिंचन प्रकल्पाचीही एका समितीमार्फत तपासणी करुन राज्याच्या हद्दीत झालेल्या परिणामांची पाहणी करावी. ही माहिती एकत्र करुन अहवाल तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनांवर कार्यवाही होणार
भंडारा जिल्ह्यातील साकोलीचे आमदार असलेले आणि त्याआधी भंडारा-गोंदियाचे खासदार असलेले नाना पटोले यांचा पूर्व विदर्भातील समस्यांचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे या आढावा बैठकीत विधानसभेचे अध्यक्ष या नात्याने नाना पटोले आवर्जून सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सूरजागड लोहखनन प्रकल्प, धान खरेदी, मेडीगट्टा बॅरेज या विषयांवर अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. यावेळी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विविध कामांबाबतची सद्यस्थिती या बैठकीत सांगितली.

Web Title: Run the Surajgad Iron Mineral Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.