नियम धाब्यावर
By Admin | Updated: January 20, 2015 22:35 IST2015-01-20T22:35:23+5:302015-01-20T22:35:23+5:30
शहराच्या लोकसंख्येसोबत शेकडो नवीन वाहनेही रस्त्यावर धावत आहेत. परिणामी शहरातील चारही प्रमुख मार्गाच्या कडेला वाहनांची रांग लागत असते. येथील इंदिरा गांधी चौकातील ट्रॉफिक सिग्नल

नियम धाब्यावर
पार्र्किंगची व्यवस्था नाही : चारही प्रमुख मार्गाच्या काठावर वाहनांची रांग
दिलीप दहेलकर - गडचिरोली
शहराच्या लोकसंख्येसोबत शेकडो नवीन वाहनेही रस्त्यावर धावत आहेत. परिणामी शहरातील चारही प्रमुख मार्गाच्या कडेला वाहनांची रांग लागत असते. येथील इंदिरा गांधी चौकातील ट्रॉफिक सिग्नल बंद असून वाहतूक पोलीस राहत नसल्याने वाहतुकीची कोंडी होते. अधिकाऱ्यांकडून शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचे प्रयत्न केले जात असले तरी नागरिकांच्या प्रतिसादाअभावी वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसविले जात असल्याचे मंगळवारी ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून दिसून आले.
‘लोकमत’ चमूने इंदिरा गांधी चौक, चामोर्शी, धानोरा, आरमोरी, चंद्रपूर मार्ग व बसस्थानक परिसरात दुपारच्या सुमारास पाहणी केली. यावेळी या चारही मार्गावर कडेला चारचाकी वाहने ठेवण्यात आली होती. इंदिरा गांधी चौकात वाहतूक पोलीस उपस्थित आढळले नाही. याशिवाय चौकातील ट्रॉफिक सिग्नल बंद असल्याने वाहनधारक नियम धाब्यावर बसवून वाहने चालवित असल्याचे दिसून आले. आरमोरी मार्गावर अनेक छोटे-मोठे दुकाने आहेत. याशिवाय या मार्गावर आरमोरी, नागपूरकडे जाणाऱ्या प्रवासी थांबा आहे. या ठिकाणी ट्रॅव्हल्स व काळी-पिवळी वाहने रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आल्यामुळे वाहनधारकांना जीव धोक्यात घालून वाहन चालवावे लागत होते. या ठिकाणी वाहतूक पोलीस नसल्यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होत असल्याचेही दिसून आले.
चंद्रपूर मार्गावरील स्टेट बँक व बँक आॅफ इंडियाच्यासमोर रस्त्याच्या कडेला चारचाकी वाहने अस्ताव्यस्त ठेवण्यात आली होती. यामुळे अनेकदा या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाल्याचेही केलेल्या पाहणीत दिसून आले. चामोर्शी मार्गावर पोटेगाव मार्गाकडे जाणाऱ्या फाट्यापर्यंत चारचाकी वाहनांची रांग लागली होती. याशिवाय काळी-पिवळी टॅक्सीचे अतिक्रमणही दिसून आले. बऱ्याचदा काळी-पिवळी टॅक्सी महामंडळाच्या बससमोर प्रवाशी बसवितानाचे दृश्य दिसून आले. चारचाकी वाहनाप्रमाणेच अनेक वाहनचालकांनी आपली दुचाकी वाहने दुकानाच्या समोर रस्त्यावर ठेवून खरेदी करीत असल्याचे दिसून आले. एकूणच शहराच्या वाहतूक व्यवस्थेत वाहतूक नियमांची पूर्णत: पायमल्ली होत असल्याने वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण होत असल्याचे आज केलेल्या पाहणीत दिसून आले.